

पणजी : गोमंतकीय समाजजीवनात गणेश चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोमंतकीयांचे भावजीवन या चतुर्थी भोवतीच फिरत असते. कामानिमित्त, शिक्षणानिमित्त परगावी असलेला गोमंतकीय चतुर्थीत हमखास गोव्यात येतो. विशेष म्हणजे आखातापासून युरोपपर्यंत जगाच्या पाठीवर कोठेही असलेला परदेशस्थ गोमंतकीयही या सणासाठी वेळात वेळ काढून घरी येतो. घरगुती गणेशोत्सवाची जोरदार धामधूम गोव्यात सुरू झाली असून गळ्यात सोनसाखळी, हातात मास्कोत (मनगटी साखळी) मिरवणार्यांचे गोव्यात आगमन झाले आहे.
चतुर्थीपूर्वी दोन दिवस गोव्यातील विविध शहरांत माटोळीचा बाजार भरत असतो. म्हापसा, मडगाव, फोंडा, वास्को, पणजी या महत्त्वाच्या शहरांसोबत काणकोण, केपे, कुडचडे, वाळपई, डिचोली अशा ग्रामीण तोंडावळा असलेल्या शहरांतही माटोळीचा बाजार फुलला आहे. कांगलां, हरणीची फुले, सुपारीचे शिपटे यासह तर्हेकवार रानफळे, फुले बाजारात उपलब्ध झाली आहेत. गणरायाच्या आगमनापूर्वी ही सगळी सजावट पूर्ण करण्याकडे तरुणांचा कल असतो. त्यासाठी बाजारांत दोन दिवस नुसती झुंबड उडालेली असते.
नारळाचे दर गोव्यात शंभरीकडे पोचले आहेत. वाढती महागाई लक्षात घेऊन सरकारने स्वयंपूर्ण बाजार या नावे उभारलेल्या दालनांत आणि फलोत्पादन महामंडळाच्या दालनात नारळ 45 रुपयांनी उपलब्ध केले आहेत. अनेक महिला स्वयंसेवी गटांना प्रोत्साहन म्हणून चतुर्थी बाजार सरकारने अनेक शहरांत भरवले असून तिथे मोदक, लाडू, करंज्या व गणेश चतुर्थीनिमित्त लागणारे इतर साहित्य वाजवी दरात उपलब्ध केले आहे.
सरकारच्या हस्तकला दालनांतून गणेशमूर्तीही उपलब्ध करून दिल्या जातात. गोव्यात बंदी असूनही मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्तींची विक्री होते. त्याला आळा घालण्यासाठी सरकारने मूर्तिकारांना प्रतिमूर्ती 250 ते 300 रुपये अनुदान देऊ केले आहे. त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात पारंपरिक मूर्तिकारांनी घेतला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी गोवा सरकारही प्रयत्नशील आहे
तिसालाचा नियम बदलला गोव्यात दोन वर्षे पाच दिवस गणपती ठेवला की तिसर्या वर्षी दीड दिवस ठेवायचा असा गावाचा नियम असायचा. मात्र आता दीड दिवस गणपती ठेवण्याबाबत लोकांत अनुत्साह असतो. अनेक जण परगावातून, परदेशातून येत असतात, सणाचा पूर्ण आनंद मिळण्यासाठी पाच दिवस गणपती ठेवण्याकडे तरुण वर्गाचा कल असतो. काही जणांकडे सात, नऊ व अकरा दिवसांचा गणपतीही असतो. यानिमित्ताने मित्रमंडळी, नातेवाईक यांचे गेट टु गेदर, पत्ते व इतर खेळ खेळून रात्री जागवल्या जातात.