

Goa Ganpati Prasad Recipe in Marathi
मंजिरी वाटवे, पर्वरी, गोवा
आषाढ तळावा, श्रावण भाजवा आणि भाद्रपद उकडावा या पंक्तीप्रमाणे कोकणात अनेक पदार्थ केले जातात. सुरुवात होते ती आषाढतळणीपासून. आषाढकापणी म्हणून केली जाणारी शंकरापाळीसारखी एक पाककृती.
नंतर श्रावणात व्रतवैकल्यांना सुरुवात होते. महिनाभर रोज देवाला नैवेद्य म्हणून गोडाधोडाचे जिन्नस केले जातात. ते अगदी गणपती विसर्जनापर्यंत म्हणजे अकरा दिवसांच्या गणपतीपर्यंत वेगवेगळ्या पाककृती आई, आजी ,काकू या सुगरणींच्या हातून बनवल्या जातात. Ganesh Chaturthi
कोकण आणि गणेशचतुर्थी एक अनोखं नातं आहे. मुंबईचा चाकरमानी वर्षभर राबत असतो तर फक्त चतुर्थीला कोकणात जाण्यासाठी सुट्टी मिळावी म्हणून. कोकणातला गणपती फक्त उत्सव नसतो तर नाती दृढ करणारा असा हा सण असतो. गणपती उत्सवात घरदार, गाव,वाडा सगळे कसे उत्साहाने भारलेले असतात.
गोकुळाष्टमीच्या धुमधडाक्यानंतर वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. गोकुळाष्टमीला दहीकाला केल्यानंतर नात्यांचा बंध दृढ करण्यासाठी गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट बघितली जाते. आपला गणराज कसा दिसतो, तयार झालीये का मूर्ती याची आठवण चित्र शाळेत जाऊन केली जाते आणि निमित्त असते गणपतीचा पाट घेऊन आलोत असं.
अशी कोकणातली गणरायाच्या आगमनासाठी तयार असलेली गणेशभक्त मंडळी. या सगळ्यात निसर्ग मागे कसा राहील बरं. वेगवेगळ्या रंगाची फुलं, पानं सजावटीसाठी हातभार लावत असतात. रानात मिळणारी फळं तर माटवीची शोभा वाढवतात. परसबागेतली काकडी, भोपळा, बागायतीतली केळी, सुपारी, नारळ,चिकू याबरोबरच कांगलं, सरणं, कवंडळं यासारखी रानफळंही दिमाखाने माटोळीच्या रांगेत दिमाखात मिरवत असतात.
निसर्गाने नटलेली वसुंधरा, हिरवेगार डोंगर, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, नारळ सुपारीच्या बागा आणि सणसमारंभांने सजलेले घर, गोकुळ. सगळं कसं उत्साहावर्धक, आनंदी, भावभक्तीने ओथंबलेलं. अशावेळी गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सण राहत नाही तर तो एक सांस्कृतिक उत्सव बनून जातो. पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा, कौटुंबिक नात्यांबरोबरच शेजारधर्म, मित्रत्व जपणारी नाती आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेणारा हा सण म्हणजे घराघरातल्या आनंदाचा, ओढीचा आणि भक्तीचा ठेवाच होय.
गणपती असो वा इतर सण. घरातल्या बायकामाणसांची धावपळ सुरू होते. तांदूळ निवडणे, खोबरं किसून ठेवणे, प्रत्येक दिवशी परंपरागत चालत आलेल्या जिन्नसांबरोबर नवीन जिन्नस करता येईल का याची तयारी करून त्यासाठी लागणारे सामान बघणे, घराची साफसफाई करणे, पाहण्याच्या स्वागतासाठी खास पदार्थ करणे, मुलाबाळांना हाताशी धरून त्यांना जमतील तशी कामे सांगत सर्वांना सांभाळून घेत सण साजरा करण्याचे कौशल्य फक्त घरातल्या करत्या बाईलाच जमतं.
गणपतीसाठी हल्ली सर्वत्र मिळणारे नैवेद्य म्हणजेच मोदक व करंज्या. तळलेले मोदक, काजू मोदक व करंज्या एवढेच पदार्थ नसून गणेशचतुर्थीत अनेक जिन्नस केले जातात.पूर्वी केले जाणारे पदार्थ हे फक्त पोट भरण्यापुरते नसायचे तर त्या त्या ऋतूत मिळणारी फळफळावळ, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून सुगरणी आपलं कौशल्य वापरून वारसा जपत.काही पाककृतींचा उल्लेख करायचा झाल्यास खालीलप्रमाणे करता येईल.
1. भोपळ्याचे घारगे
लाल भोपळ्यापासून बनवला जाणारा एक गोड पदार्थ.भोपळ्याची साल काढून किसून तुपावर परतून त्यांत मावेल एवढे तांदूळ पीठ व गूळ घालून उकड काढून घेतात. थोड्या वेळाने जराशी थंड झाल्यावर केळीच्या पानावर गोल आकारात थापून त्यावर खसखस किंवा पांढरे तीळ लावून तेलात तळून घेतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ दोन तीन दिवस टिकतो. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांना नैवेद्य म्हणून देण्यासाठी उपयुक्त असे हे भोपळ्याचे घारगे.
2. खांडवी
अगदी तीन चार पदार्थ वापरून पटकन होणारा असा हा जिन्नस. तांदूळाच्या पिठात (जाडसर रवा ) गुळ, बारीक किसलेलं खोबरं, वेलची (काही ठिकाणी हळदीचं पान घालतात) घालून सर्व मिश्रण एका ताटात पसरवून वाफवून घेतात. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पडल्या जातात. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थापासून केली जाणारी खांडवी बनवणं फार कौशल्याचा काम असतं.
कारण वाफेवर शिजवलेली खांडवी योग्य प्रमाणात घातलेले जिन्नस नसतील तर त्याची खीर व्हायला वेळ लागत नाही. खांडवी हे नाव वाचून आजच्या मुलांना तोंडून “म्हणजे काय?” असे उद्गार नक्की येतील.
3. नारळाचं सांदण
गूळ, नारळाचं दूध आणि तांदूळाचे पीठ वापरून केला जाणारा गोड पदार्थ. चमच्याने खाता येईल असा घट्टसर हा पदार्थ.
अशा प्रकारचे सांदण फणसाचा रस घालूनही केले जाते. फार उशिरापर्यंत असणारा रसाळ किंवा कापा फणस कौतुकास्स पात्र ठरतो. फणसाचे सांदण सोन्याच्या भावाने मागितले जाते. घरची सुगरण मग ‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा’ तसे सर्वांना शेजारीपाजारी आमचा गणपतीचा नैवेद्य म्हणून मायेने वाटते.
4. तवसोळी
मिरगाच्या सुरुवातीला लावलेल्या काकडीच्या वेलावर आता पूर्ण जून झालेली काकडी असते. पुढच्या हंगामात काकडीचे बी हवे म्हणून ठेवल्या जातात त्या काकड्या म्हणजेच तशी चतुर्थीला फोडली जातात. त्यांतल्या बिया मागील दारी भिंतिवर सारवल्या जातात आणि तवशी स्वयंपाकघरात वापरली जातात. काही ठिकाणी गोड तवसाळी केली जातात तर काही वेळा काकडीचा कायरस केला जातो. गोड जिन्नसांबरोबर तिखट कायरस नैवेद्याच्या पानाची शोभा वाढवतो.
5. पातोळ्या
नागपंचमीला केला जाणारा हा पदार्थ गणेशचतुर्थी केला जातो. हळदीच्या पानावर मिश्रण पसरवून वाफवून केलेल्या पातोळ्या पूर्ण दिवस भुकेसाठी कधीही खा म्हणून तयार असतात. लहान मुलांना खूपच आवडणारी अशी ही पातोळी. हळदीचा वास सर्वत्र पसरल्याने घराशेजारून जाणाराही ओळखायचा आज “गणपतीचा नैवेद्याला पातोळी” आहे.
6. गणपतीचा खाऊ
आजीच्या हातचा गणपतीचा खाऊ हा जिन्नस अप्रतिम असायचा. तांदूळ,गूळ, नारळ, वेलची घालून खांडवीसारखाच केला जाणार हा जिन्नस तुपाची धार सोडून आजीने गरमागरम दिलेला गणपतीचा खाऊ खाताना आजही मन बालपणीच्या आठवणीत रमतं.
7. पुरणाचे लाडू
पुरणपोळीसाठी करतात तसे पुरण केले जाते. मात्र हे पुरण बारीक न वाटता जरा घट्ट शिजवले जाते व त्याचे लाडू बनवले जातात. पुरणपोळीला व बेसनाच्या लाडवाचा पर्याय म्हणून झटपट होणारे हे लाडू आधी नैवेद्यासाठी केले जात.
8. उकडपेंडी
ताकातली उकड असेही म्हणतात. पातळसर ताकात तांदळाचे पीठ घालून नंतर हे मिश्रण फोडणीला टाकून मंद आचेवर शिजवून घेतात. नंतर एका पानावर थापून त्याला आकार दिला जातो. तर काही ठिकाणी हा पदार्थ चमच्याने खाल्ला जातो. याला थालीपीठाचा आकार येण्यासाठी काही ठिकाणी सगळे जिन्नस एकत्र करून पानावर थापून मग भाजून घेतले जातात. आंबट गोड अशा चवीचा हा पदार्थ लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीचा असून झटपट होणार आहे.
9. उकडकरंजी
तांदळाच्या पिठाची पारी करून त्यात गूळ खोबऱ्याचं सारण भरलं जात आणि छोट्या करंजीचा आकार देऊन कडेला दुमड घातली जाते. नंतर मध्यम आचेवर वाफवून घेतात. तळलेल्या करंजीला पर्याय म्हणून हा पदार्थ केला जातो.
10. खोबऱ्याची बर्फी (वड्या)
किसलेले खोबरं, गूळ किंवा साखर, दूध यांचे मिश्रण करून नंतर मिश्रण मंद आचेवर शिजवून घेतात. मिश्रणाचा गोळा होत आल्यावर ताटाला तूप लावून हे मिश्रण ओतून त्याच्या वड्या पडल्या जातात. घरात भाजलेले काजूगर सजावटीसाठी वरून पेरले जातात. अतिशय चविष्ट आणि कमी जिन्नसांत होणारी ही बर्फी कोकणचा मेवा म्हणून मिरवते.
अशाप्रकारे भजनासाठी येणाऱ्यांना वाटाणे, चवळी, हरभरा या कडधान्याची उसळ, करंजी, लाडू, (गव्हाचे पिठाचे, रव्याचे) पंचखाद्य, ( गूळ घालून केलेला पदार्थ) तळलेले मोदक व चहा दिला जातो.
कोकणात जे उपलब्ध आहे त्याचा वापर करून बनवले जाणारे पदार्थ तब्येतीला पुरक असतातच पण निसर्गाशी एकरूप व्हायल ही मदत करतात. असा हा गणेशोत्सव निसर्ग मानव यांच्यातील दुवा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
असे हे पदार्थ करताना घरभर गजबज असायची. आई, काकू, आजी एकमेकांना मदत करीत, गप्पा करीत तर कधी गाणी म्हणत हे पदार्थ करत असत. मुलांचे धावणे,खेळ, मध्येच होणारी लुटूपुटूचे भांडण, दंगामस्ती असायची. तर पुरुष मंडळी देवघर सजवण्या व्यस्त असायची.दिवाणखान्यात बसून आलेल्यांशी गप्पा करत बसायची.
स्वयंपाक घरातल्या गोड तिखट पदार्थाचे वास, गप्पा गोष्टींचा आवाज आणि भावभक्तीने देवासमोर लावलेले उदबत्ती शांत तेवणारी समय आणि आरत्या भजन स्तोत्र यामुळे भावभक्तीचा पसरलेल्या दरवळ.. मन आणि वातावरण सगळं कसं अल्हाददायक असतं.
वेळेअभावी हे पारंपारिक जिन्नस काही प्रमाणात कमी होऊ लागले आहेत. रेडीमेड मिठाई नैवेद्यासाठी आणली जात आहे. त्यामुळे हे पदार्थ थोडेसे आठवणीत अडकू लागलेले आहेत.
गणेश चतुर्थी म्हणजेच फक्त मोदक नाही तर श्रावणाचा सुगंध, आईच्या हातच्या पदार्थाची चव आणि परंपरा जपण्याचा वसा होय. पुढच्या पिढीला कळण्यासाठी हे जिन्नस घरात करणे गरजेचे आहे. त्यातून या रेसिपी टिकणार आहेत आणि पुढच्या पिढीला हे शिकून आपण हा वायचा पुढे नेण्यासाठी तयार करणार आहोत. त्यासाठी थोडे कष्ट घेण्याची गरज आहे.
“बाप्पा फक्त मूर्तीमध्ये नाही तर आईच्या हातच्या जेवणात, तिच्या मायेत, घरात बनवलेल्या जिन्नसात आणि जपून ठेवलेल्या नात्यात असतो. तेव्हा वर्षातून एकदा तरी गणपतीसाठी मूळ घरी यायलाच हवं.