

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या श्री गणरायाचे रविवारी घरोघरी जल्लोषात आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात स्थापना आणि पूजा करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळापासूनच लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी भाविकांची मोठी लगबग पाहायला मिळाली.
ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत लाडक्या गणरायाची मूर्ती नेताना भाविक दिसत होते. वर्षभर आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांच्या आनंदाला उधाण आले असून, आजपासून राज्यभरात पारंपरिक 'घुमट' वाद्याच्या मंगल तालावर घरोघरी आणि सार्वजनिक मंडपात आरतीचे सूर घुमणार आहेत.
पणजी, मडगाव, म्हापसा, फोंडा, काणकोण, डिचोली यासह राज्यातील सर्वच लहान-मोठ्या बाजारपेठांमध्ये पूजेचे साहित्य, सुगंधी फुले, दर्जेदार फळे आणि तोरणे खरेदीसाठी भक्तांची गर्दी दिसत होती. घराघरांमध्ये साफसफाई, मखर सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई पूर्ण करून लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त वाट पाहत होते.
गणेशोत्सव १० दिवसांऐवजी १२ दिवसांचा असणार आहे. २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाईल. उत्सव काळात सुरक्षेसाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. सुरक्षित आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) राज्यभर तपासणी मोहीम राबवत आहे.
पोलिस प्रशासनही सुरक्षेसाठी सज्ज झाले आहे. सणाच्या काळात वाहतुकीत होणारी वाढ विचारात घेत काही ठिकाणी मार्ग वळवण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.
गोमंतकीय परंपरेनुसार घरोघरी श्रींच्या मूर्तीवर माटोळी बांधली जाते. यामध्ये रानफळे, रानफुले, नारळ, काकडी, चिबुड, केळी, सुपारीची चिपटे, विविध वनस्पती आणि फळांची आकर्षक पद्धतीने सजावट केली जाते. यासाठी परिसरातील डोंगरदऱ्यांतून फळे-फुले जमविली जातात. तसेच स्थानिक बाजारपेठांतूनही फळे आणि वनस्पती खरेदी केली जाते.
बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरांत मोदक, नेवऱ्या (करंजी) आणि गोमंतकीय पारंपरिक गोड पदार्थांचा महानैवेद्य तयार केला जात आहे. परंपरेनुसार राज्यभरात दीड दिवस, पाच दिवस, सात, नऊ, ११ दिवस आणि अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पाची विधिवत सेवा केली जाते.
रोजगारासाठी घरापासून दूर गेलेले अथवा अन्यत्र स्थायिक झालेले भाविक आपल्या मूळ घरी परतले आहेत. त्यामुळे वर्षभर बंद दिसणाऱ्या घरांचे दरवाजे उघडले आहेत. तिथे गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत होते. ही घरे पुढील काही दिवस माणसांनी गजबजलेली दिसतील.