सांगली : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर याऽऽ’चा जयघोष आणि विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणरायाचे रविवारी मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आले. मिरवणूक व रथोत्सव सोहळ्यास सांगलीसह परिसरातील आणि विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते.
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणरायाला ऐतिहासिक परंपरा आहे. येथील गणेश दुर्ग या राजवाड्यामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पाच दिवस विविध कार्यक्रम झाल्यानंतर रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्याहस्ते सरकारी संस्थान गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, राणीसाहेब राजलक्ष्मी पटवर्धन, राजकन्या पौर्णिमाराजे पटवर्धन, व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर, भाजपा नेते पृथ्वीराज पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, दिगंबर जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
आरती झाल्यानंतर संस्थानच्या सजवलेल्या रथामधून शाही मिरवणुकीला सुरुवात झाली. यामध्ये वारकरी, ढोल-ताशा पथक, ध्वजपथक, बँजो, लेझीम आदींनी मिरवणुकीची रंगत वाढवली. विविध वेशभूषा परिधान केलेले मावळेही मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत सजवलेली बैलगाडी, घोडेही होते. राजवाड्यातून निघालेली ही मिरवणूक राजवाडा चौक, गणपती पेठ या मार्गावरून गणपती मंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता आली. यादरम्यान मार्गावर दोन्ही बाजूने भाविकांची मोठी गर्दी होती. भाविक रथावर पेढे, फुटाणे यांची उधळण करीत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर याऽऽ’ याचा जयघोष सुरू होता. गणपती मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक टिळक चौकातून सरकारी घाट येथे आली. सायंकाळी विधिवत पूजा आणि आरती करून गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, गणेशोत्सव काळात गणेशभक्तांनी चांगल्या प्रकारे प्रशासनाला सहकार्य केले असून यापुढेही आपला उत्सव अनंतचतुर्दशीपर्यंत चालू राहणार आहे, तरी सर्व सांगली जिल्ह्यातील तमाम गणेशभक्तांनी शांततेमध्ये आणि प्रशासनाला सहकार्य देऊन उत्सव पार पाडावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
संस्थानच्या मिरवणूक मार्गावर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागले आहेत. अनेकांकडून प्रसाद, पेढे, फुटाणे याचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येत होते.
संस्थानच्या मिरवणूक व रथोत्सव सोहळ्यात पारंपरिक वाद्यांबरोबरच फटाक्यांची आतषबाजीही मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. ही आतषबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
संस्थानच्या मिरवणुकीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, हे लक्षात घेऊन पोलिसांनी यंदा वाहतूक व्यवस्थेचे योग्यपणे नियोजन केले होते. मिरवणूक मार्गावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली होती.