

चिपळूण शहर; पुढारी वृत्तसेवा : पावसाने सकाळच्या वेळेत घेतलेल्या विश्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाजंत्री व फटाक्यांच्या आतषबाजीत बुधवारी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला घरोघरी नेेले. मंगळवारी सायंकाळी व रात्री उत्सवाच्या पूर्वसंध्येला पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे गणेशोत्सवात सकाळच्या वेळेत देखील पावसाचा अंदाज घेऊन गणेशभक्तांनी पावसापासून सुरक्षित उपाय करीत गणरायाच्या मूर्ती घरोघरी नेल्या.
तब्बल दोन वषार्ंनंतर कोरोना संसर्ग निर्बंधातून मुक्त झालेल्या उत्सवाला आज कोकणातील खर्या गणेशोत्सवाच्या आनंद व उधाणाची झालर लागली होती. सकाळच्या वेळेत पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सकाळपासूनच गणेश मूर्ती घरी नेण्याची लगबग भक्तांकडून सुरू झाली होती. विविध वाजंत्री, सजविलेली वाहने, फटाक्यांची आतषबाजी अशा थाटात मिरवणुकीने अनेक भक्तांनी गणरायाच्या मूर्ती घरी नेऊन प्रतिष्ठापना केली.
पहाटेपासूनच सायंकाळी उशिरापर्यंत गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त असल्याने मूर्तींची विधिवत पूजा करणार्या भटजींची लगबग आणि धावपळ सुरू होती. घराघरांतून गणरायाला आवडणार्या मोदकासह पंचपक्वान्नाचा सुगंध दरवळत होता. चाकरमान्यांकडून गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्याच्या ठिकाणी सकाळपासून सजावट करण्यासाठी लगबग सुरू होती. लहान मुलांच्या उत्साहाबरोबरच युवकांचा व ज्येष्ठांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील गणरायाच्या पूजेच्या छोट्या मूर्ती कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मिरवणुकीने वाजतगाजत उत्सवस्थळी नेल्या. पावसाने सकाळच्या वेळेत दिलासा दिल्याने व दोन वषार्ंनंतर निर्बंधमुक्त झालेल्या उत्सवाला गणेशभक्तांकडून उत्साहात गणरायाचे स्वागत केले जात होते. कोरोना महामारीमुळे अनेक सण-उत्सवावर बंधने घालावी लागली. यंदा मात्र, निर्बंध शिथिल झाल्याने घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशोत्सवाला भक्तीचा नवा जोश आला आहे. तसेच गेल्या दोन वर्षांनंतर एकत्रित जोश या चतुर्थीत दिसून येत आहे.