

पणजी : गोवा फॉरवर्ड बिगर भाजप, बिगर काँग्रेस पर्याय देण्याच्या विचारात आहे. प्रश्न मांडणारा, 'वोकल फॉर लोकल' पर्याय हवा आहे, तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असा गौप्यस्फोट अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
सध्या गोव्यात इंडिया आघाडी अस्तित्वात नसून ती उभी करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्नही होताना दिसत नाहीत. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील युती गृहीत धरता येणार नाही. काँग्रेस नेतृत्व आम्हाला गंभीरपणे घेत असल्याचे कोणतेही संकेत नाहीत, असे ते म्हणाले.
सरदेसाई म्हणाले, गोव्यातील अनेक मतदार काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांपलीकडे पर्यायी राजकीय विचारसरणीच्या शोधात आहेत. राज्यातील राजकारणात तिसऱ्या पर्यायासाठी जागा असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी पूर्वीपेक्षा आपले संबंध सुधारलेले आहेत, पण ते आम्हाला गृहीत धरत नाहीत असे आमच्या लक्षात आले आहे. अलीकडेच प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर वारंवार त्यांनी काँग्रेसला २१ जागा द्या, काँग्रेसला २१ जागा मिळायला हव्यात, असे वक्तव्य केले आहे. काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला किंवा तसा काही उल्लेखही त्यांनी केलेला नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेसकडे सध्या आमदार संख्या एकांकी आहे. तेवढ्यावर ते मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहत आहेत. त्यांच्याकडे काहीच कृतिकार्यक्रम नाही. हातपाय न हलवता लोक काँग्रेसला निवडून देणार अशाच भ्रमात ते आहेत. गोवा फॉरवर्डने घेतलेल्या सर्व्हेचे निष्कर्ष यायला अजून तीन आठवडे लागतील, त्यानंतर याबाबत अधिकृत निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
गोवा फॉरवर्डचे विलीनीकरण रखडवले
केंद्रातील काँग्रेसचे प्रवक्ते सांगतात की छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. गोवा फॉरवर्डने दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये विलीन व्हायची तयारी दाखवली होती पण त्यावर त्यांनी काही निर्णय घेतला नाही. गिरीश व माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासोबत वेगवेगळ्या वेळी मी डेस्क इन्चार्ज माणिकराव ठाकरे यांची भेटही घेतल्याचा खुलासा त्यांनी केला.