

पणजी : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या सीमेवर प्राणाची पर्वा न करता देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी 'एक राखी सैनिकांसाठी' हा उपक्रम राबविला जात असल्याचे केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.
दोनापावला येथील राजभवनाच्या जुआरी सभागृहात गुरुवारी चैतन्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोवा राज्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, अभिनेता योगेश सोमण, पद्मश्री शशी सोनी आणि चैतन्य प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अनघा आर्लेकर उपस्थित होते.
आर्लेकर म्हणाले की, चैतन्य प्रतिष्ठानतर्फे सलग १३ वर्षे 'एक राखी सैनिकांसाठी' हा उपक्रम आयोजित केला जात आहे. सैनिक हे देशाचे आणि देशवासीयांचे संरक्षक आहेत. घरापासून दूर राहून निःस्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना गोवेकरांशी जोडण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो. सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्याबरोबरच भारतीय उत्सवांमध्ये त्यांना सहभागी करून घेऊन त्यांचा सन्मान करण्याचे कार्य या उपक्रमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा उल्लेख करताना आर्लेकर म्हणाले की, पर्रीकर हे देशातील युवांसाठी आदर्श ठरले. विद्यार्थ्यांनी देशसेवेची भावना मनात रुजवावी, असे आवाहन त्यांनी केले. विविध विद्यालये, संस्था आणि नागरिकांनी जमा केलेल्या राख्या आयोजकांकडे सुपूर्द करण्यात आल्या. या राख्या सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत. सूत्रसंचालन विठ्ठल शेळके यांनी केले.
चित्रपट कलाकार योगेश सोमण यांनी मनोहर पर्रीकर यांचा गौरव करताना सांगितले की, पर्रीकर संरक्षणमंत्री असताना उरीची घटना घडली. त्यानंतर आक्रमकांना त्यांच्या देशात घुसून मारण्याचा विचार त्यांनी देशाला दिला. त्यामुळे पर्रीकर आपले आदर्श असल्याचे सोमण यांनी सांगितले. 'उरी' चित्रपटात पर्रीकरांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यावर त्यांच्या विचारांमुळे आपण कोणताही विचार न करता भूमिका स्वीकारल्याचे सोमण यांनी सांगितले.