Goa Drowning Cases | जलाशय ठरतायत मृत्यूचे सापळे; प्रशासन सतर्क

Goa Drowning Cases | आठ महिन्यांत बुडण्याच्या 8 घटना; 17 संवेदनशील ठिकाणी उपाययोजना
Drowning News
गुहागर समुद्रात बुडणार्‍या दोन पर्यटकांना जीवदानPudhari Photo
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

धारबांदोडा तालुक्यातील जलाशय मृत्यूचे सापळे बनत चालल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांत बुडून झालेल्या आठ दुर्घटनांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागल्याने प्रशासन सतर्क झाले असून, १७ संवेदनशील ठिकाणांवर विशेष उपाययोजना राबविण्यासोबतच शाळा, ग्रामसभा आणि स्थानिक पातळीवर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Drowning News
Beed Accident | श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी होडी दुर्घटना : ट्रस्ट - प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच निष्पाप भाविकांचा बळी?

अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर, उपजिल्हाधिकारी, मामलतदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच उपस्थित होते.

बैठकीत उपजिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आठ महिन्यांतील बुडण्याच्या घटनांचा सविस्तर आढावा सादर केला. या कालावधीत तालुक्यात आठ बुडण्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विद्यार्थी तसेच पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तालुक्यातील १७धोकादायक व संवेदनशील जलस्थळांची ओळख पटविली आहे.

नद्यांमधील पाण्याचा वेग व खोलीबाबत माहिती नसणे, मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे, निर्जन भागात सहलीसाठी जाणे, नदीकाठावर अनियंत्रित मार्गांचा वापर आणि बेदरकारपणे पोहणे ही दुर्घटनांची प्रमुख कारणे असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी शिक्षण व पोलिस विभागाच्या सहकार्याने शाळांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले.

विद्यार्थ्यांना नदी, ओढे, धरण परिसर आणि खोल पाण्याच्या ठिकाणांबाबत जागरूक करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींना विशेष ग्रामसभा घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ग्रामसभांमधून नागरिकांना असुरक्षित जलाशयांमध्ये जाण्याचे धोके समजावून सांगत सामुदायिक सहभागातून दुर्घटना रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Drowning News
Ganpatipule Drowning incident : गणपतीपुळे समुद्रात पाच पर्यटक बेपत्ता

पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी संवेदनशील ठिकाणी नियमित गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या असून, धोकादायक प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले. दरम्यान, सुरक्षित पोहणे व सहलींसाठी योग्य ठिकाणांची निवड करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. जनजागृती, सतर्कता आणि नागरिकांच्या सहभागातून बुडण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट घडवून आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रतिबंधात्मक यंत्रणा उभारण्यावर भर...

या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. धोकादायक ठिकाणी सूचना व इशारा फलक उभारण्यात आले असून पोलीस विभागाकडून नियमित गस्त वाढविण्यात आली आहे. विविध विभागांमध्ये समन्वय साधून अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा उभारण्यावर भर दिला जात आहे.

logo
Pudhari News
pudhari.news