

पणजी : न्यायालयीन निर्देश आणि किनारपट्टीवरील पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यव्यापी ठेव परतावा योजना (डीआरएस) प्रत्यक्षात राबविण्याच्या दिशेने पुढे जात आहे. या योजनेमुळे प्लास्टिक व काचेच्या पेय बाटल्यांच्या संकलन आणि पुनर्वापराला चालना मिळणार असल्याचे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, हा धोरणात्मक बदल देशभरात न्यायपालिकेने सुरू केलेल्या उपक्रमाशी सुसंगत आहे. मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूत मद्याच्या बाटल्यांसाठी ठेव परतावा प्रणालीचा विस्तार करण्याचे निर्देश दिले आहेत.
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने डीआरएस नियमांच्या अंमलबजावणीवर देखरेख केली असून, केरळ उच्च न्यायालयानेही राज्य महामंडळांमार्फत अशाच प्रकारच्या योजनेची शिफारस केली आहे.
या उपक्रमात प्रमुख पेय उत्पादक कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून, राज्यातील अनेक ब्रँड्स क्यूआर कोडयुक्त पॅकेजिंगच्या प्रायोगिक प्रकल्पात सहभागी झाले आहेत. राज्यभरात १०० हून अधिक रिव्हर्स वेंडिंग मशीन (आरव्हीएम) उभारण्यात येत असून, त्यामुळे बाटल्या परत स्वीकारण्याची व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
याशिवाय, १५० हून अधिक ग्रामपंचायती आणि आठ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी संकलन केंद्रांसाठी ना हरकत प्रमाणपत्रे दिली आहेत. पर्यटन क्षेत्रातील संकलन मोहिमांना बळ देण्यासाठी सुमारे एक हजार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे आणि मद्यविक्री आस्थापनांनीही नोंदणी केली आहे.
पेडणे येथे उद्या शिष्यवृत्ती वितरण
पेडणे : ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने पेडणे तालुक्यातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम रविवार, १९ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता संत सोहिरोबानाथ आंबिये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, विरनोडा-पेडणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पेडणे तालुक्यातील ३३ हायस्कूलमधील एकूण २९ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३,००० रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक दुर्गादास परब उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकार, उद्योजक अनंत तिरोडकर, दयाकांत हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञ राजेंद्र बांदे तसेच बिचोली अर्बन बँकेचे अध्यक्ष विठ्ठल प्रभुदेसाई उपस्थित राहणार आहेत. ऊर्जा फाउंडेशन गेली १४ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करत आहे. यंदा गोव्यातील १० तालुक्यांतील ७०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३,००० रुपये प्रमाणे एकूण २१ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत आहे.
व्यापक जागृती मोहीम...
ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी माहिती, शिक्षण आणि संवाद मोहिमाही राबविण्यात आल्या आहेत. गोवा काजू महोत्सव, स्पिरिट ऑफ गोवा, सांज उत्सव तसेच एफसी गोवाच्या फुटबॉल सामन्यांदरम्यान क्यूआर-सक्षम बाटली परतावा प्रणालीची प्रात्यक्षिके सादर करून माहिती देण्यात आली.