मडगाव : पुढारी वृत्तसेवा
कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अजून एक पीडिता समोर आली असून आणखी काही पीडिता न्यायासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास सुरू आहे. तपासात जशी माहिती पुढे येईल, त्यावरून आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.
प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊनच तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे, जेणेकरून सखोल चौकशी होईल आणि पीडितांची ओळखही गुप्त राहील, अशी माहिती पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली. दरम्यान, डीजीपी यांच्या माहितीनंतर संशयित सोहम याच्या मित्रांचे धाबे दणाणले आहेत.
कुडचडे लैगिंक अत्याचाराला दै. 'पुढारी'ने वाचा फोडल्यानंतर स्थानिकांनी आक्रमक होत पोलिस निरीक्षकांना घेराव घातला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयित सोहम सुशांत नाईक या नगरसेवक पुत्राला अटक केली होती.
त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून आतापर्यंत ४ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. संशयिताला न्यायालयाने आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर, क्राईम ब्रँच याप्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
क्राईम ब्रँचचे दोन स्वतंत्र पोलिस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितांच्या जवान्या नोंदवून घेण्यासोबत आणखी पीडित मुलींचा शोध घेतला जात आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्यावर तपास अधिकाऱ्यांचा भर आहे.