

काब्राल हॅटट्रिक करणार की नवीन चेहऱ्याला संधी
काब्राल यांच्या भूमिकेकडे लक्ष
सांगे : संदीप मापारी
कुडचडे मतदारसंघात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची रांग लागली असून प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या परीने तयारी करीत आहे. भौगोलिकदृष्ट्या कुडचडे मतदारसंघ लहान असला तरी या मतदारसंघात २५ हजार ८०० मतदार आहेत. त्यात हिंदू १६ हजार ३००, ख्रिस्ती ७ हजार ३०० तर मुस्लिम २ हजार २०० मतदार आहेत.
कुडचडे मतदार संघात हिंदू मतदार जास्त असूनही आमदार नीलेश काब्राल यांनी तीनवेळा हॅट्ट्रिक केली आहे. २०२२ च्या निवडणुकीत नीलेश काब्राल फक्त ६७२ मतांच्या फरकाने विजयी झाले होते.
काब्राल यांना ९ हजार ९७३, काँग्रेसचे अमित पाटकर यांना ९ हजार ३०१, आरजीपीचे आदित्य देसाई यांना २ हजार १०३, आपचे गॅब्रियल फर्नांडिस यांना ८३०, मगोचे विठोबा प्रभूदेसाई यांना ३१३, तर अपक्ष उमेदवार अजय बेयर यांना फक्त ५१ मतावर समाधान मानावे लागले होते.
२०२७ च्या निवडणुकीत आमदार नीलेश काब्राल, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई, माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडरकर, रोहन गावस देसाई, पुष्कल सावंत देसाई यांच्या नावाची चर्चा सध्या तरी चालू आहे. सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार नीलेश काब्राल यांनी, 'आपल्याला भाजपने तिकीट दिले तरी यावर विचार करावा लागेल', असे विधान केल्याने कुडचडेचे वातावरण बदलू लागले आहे.
विधानाचे निमित्त करून भाजपने काब्रालना तिकीट दिलेच नाही तर ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा चालू आहे. काब्राल यांनी उमेदवारी स्वीकारले नाही किंवा त्यांना उमेदवारी दिली नाही, तर भाजपकडे दुसरा पर्याय आहे. तो म्हणजे, जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई. सिद्धार्थ गावस देसाई हे भाजपचे सच्चे कार्यकर्ते. त्यांनी एकदा शेल्डेचे उपसरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर २०२० साली शेल्डे जिल्हा पंचायतीत १७०० मतांच्या फरकांनी विजयी झाले आणि उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पद सांभाळले.
२०२५ च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत ते ३ हजार ६५५ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. १८ पैकी १७ बुथवर त्यांनी बाजी मारली आणि आता ते दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पंचायत क्षेत्रात ज्यांचा प्रभाव आहे, तोच निवडणुकीत भरारी मारू शकतो, असा कुडचडेचा इतिहास आहे.
काब्राल यांनी अपक्ष उमेदवारी भरली, तर भाजपचे कार्यकर्ते, महिला वर्ग त्यांच्याबरोबर राहणार काय? असा प्रश्न निर्माण होतो. काब्राल यांनी रोजगार दिला. कित्येक लोकांना मदत केली. ते एक शांत स्वभावाचे आमदार मानले जातात. रोहन गावस देसाई हे सुद्धा भाजप उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी कुडचडेत कार्यालय उघडले असून ते सक्रिय झाले आहेत. माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हेही सक्रिय झाले असून त्यांनी संगिनी नावाचा उपक्रम सुरू केला आहे. माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडरकर तसेच पुष्कल सावंत देसाई हे काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक असून त्यांनी गोवा राखण यात्रेत जोर लावला होता. कुडचडे मतदारसंघात भाजप बरोबर काँग्रेस पक्षातही गद्दारी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आरजी, आप पूर्ण गायबच
या मतदार संघासाठी आरजीपी, आप यांनी २०२२ ची निवडणूक झाल्यापासून ते पूर्णपणे गायबच झालेले आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातच खरी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येते यात माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहावे लागेल.