

पणजी : पुढारी वृत्तसेवा
चिंबल येथील कदंब पठारावरील प्रस्तावित असलेला युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ येथून स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली.
दरम्यान, यासंदर्भात अधिकृत माहिती सरकारकडून मिळालेली नसल्याने घटनास्थळी सुरू असलेले आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्या नेत्यांनी दिली. चिंबल परिसरात या प्रकल्पांना विरोध होत होता.
ग्रामस्थांनी पर्यावरणीय परिणाम, वाहतूक कोंडी आणि स्थानिक जीवनशैलीवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यासोबतच तेथील तोयार तळ्यावर या प्रकल्पांचा वितरित परिणाम होणार असल्याचे स्थानिकांचे मत होते. त्यानंतर सरकारने ग्रामस्थांच्या भावनांचा आदर राखत प्रकल्प अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेतला.
पर्यटन विभागाने स्पष्ट केले की, युनिटी मॉल व प्रशासन स्तंभासाठी नवीन जागा लवकरच निश्चित केली जाईल. नव्या ठिकाणी आवश्यक सर्व परवानग्या आणि नियोजन करून हे प्रकल्प पुढे नेण्यात येणार असल्याचेही विभागाने सांगितले.
अधिकृत कल्पना नाही; उपोषण सुरूच : खोलकर
चिंबल येथून युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्प हलविण्यात आल्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे उपोषण गुरुवारीही सुरूच राहणार असल्याची माहिती आंदोलनाचे नेते अजय खोलकर यांनी दिली. ते म्हणाले की, प्रकल्प स्थलांतराबाबत तोंडी आश्वासने देण्यात येत असली तरी लेखी व अधिकृत कळवणी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही.
उद्या ग्रामस्थ आंदोलनस्थळी एकत्र येऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यावर चर्चा करणार आहेत. याशिवाय, ३० जानेवारी रोजी प्रस्तावित असलेल्या 'महा मोर्चा'बाबतही सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे खोलकर यांनी स्पष्ट केले. सरकारने तातडीने अधिकृत निर्णय जाहीर करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.