

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारने मुख्यमंत्री देव दर्शन यात्रा योजनेत सुधारणा केली आहे. वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि छाननी प्रणालीमध्ये बदल केले आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पात्रता वयाच्या निकषांमध्ये करण्यात आला असून या योजनेचा लाभघेण्यासाठी अर्जदारांचे वय किमान ५० वर्षे आणि जास्तीत जास्त ७० वर्षे असावे, पूर्वी ९० वर्षे पर्यंतच्या नागरिकांना प्रवेश होता.
मात्र ८० ते ९० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन यात्रेत अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने व सोबतच्या इतर लोकांना त्यांच्या सोबत राहणे शक्य होत नसल्याने वयोमर्यादा कमी केल्याचे कळते. पूर्वी, दोन स्वतंत्र छाननी समित्या एक उत्तर गोव्यासाठी आणि एक दक्षिण गोव्यासाठी अर्जाची पडताळणी करत असत. ही प्रणाली आता मंजुरी पत्रे जारी करण्यासाठी एकाच मंजुरी समितीने बदलली आहे.
अर्जदारांना स्व-वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा स्व-घोषणापत्र सादर करावे लागेल. ज्यांनी एकदा या योजनेचा लाभ घेतला त्याना संधी नसेल. ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त झालेले अर्ज मंजुरी समितीसमोर ट्रिप-टू-ट्रिप आधारावर सादर केले जातील. आता, अर्जदारांना पोर्टलच्या आवश्यकतांनुसार, विभाग किंवा नियुक्त एजन्सीने विकसित केलेल्या वेब पोर्टल किंवा अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल.