

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
पणजी या शहरानंतर २०१६ साली साखळी शहराचा विकास नियोजन आराखडा तयार करण्यात आला होता. या विकास आराखड्याप्रमाणे साखळी शहरात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. विकास आराखड्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले असून आज हे शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक साखळीवासीयाची आहे. ज्यावेळेस शहर स्वच्छ सुंदर व निरोगी राहणार त्यावेळेस साखळी येण्याची व राहण्याची ओढ लोकांना बाढणार तेव्हाच साखळीतील फ्लॅट, भूखंड यांना चांगले दर प्राप्त होतील.
व्यावसायिक दृष्ट्याही साखळीची प्रगती होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी पालिका सभागृहात केले. अमृत मिशन २.० या अंतर्गत सुमारे ८ कोटी रु. खर्चुन साखळीतील वाळवंटी नदीचे करण्यात येणारे सुशोभीकरण व सौदर्याकरण या प्रकल्पाताची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्वेकर, नगरसेवक आनंद काणेकर, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, निकिता नाईक, रश्मी देसाई, दीपा जल्मी, अंजना कामत, मुख्याधिकारी श्रीपाद माजिक व इतरांची उपस्थिती होती.
साखळी शहर हे आज सर्व सोयीनी युक्त असे शहर बनत असून या शहराची व्याप्ती वाढत आहे. केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण आज साखळीत उपलब्ध करून देण्यात येत असल्याने येथे लोक थेट वास्तव्यासाठी साखळीला प्राधान्य देत आहेत. हे सर्व करत असताना हे शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
निवडून आल्यानंतर २०१२ साली आपण दिलेला 'हरित हरवळे, विकसित विर्डी व सुंदर साखळी' हा नारा प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळत आहे, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. सरकारी इस्पितळ ते दत्तवाडी पुलापर्यंतचा रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण, साखळी बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंतचा रस्ता रुंदीकरण व त्यांचेही सुशोभीकरण, साखळी बाजाराला आवश्यक ती सर्व सोयी सुविधा व इतर गोष्टी पुरविण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
सहकार्य देत सामंजसपणाची भावना राखल्यास या कामांना लवकरच पूर्णत्व मिळणार, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, कोनशिला अनावरण करून व श्रीफळ वाढवून वाळवंटी नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पात भव्य दिव्य प्रवेशद्वार बालोद्यान, खुले उद्यान, खुला जिम, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार
परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची
नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी सांगितले की, साखळी शहराचा व संपूर्ण मतदारसंघाचा विकास मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. स्वतः मुख्यमंत्री हे साखळीबासीयांसाठी जादूची कांडी ठरली असून त्यांच्या लक्षात आणून दिलेली प्रत्येक विकासाची गोष्ट साखळीवासीयांसाठी प्रत्यक्षात उपलब्ध होत आहे. या सर्व विकासाबरोबरच स्वच्छ व सुंदर साखळीचा नारा पुढे नेताना सांडपाणी उघडधावर सोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिकेला मुख्यमंत्र्यातर्फे मुक्तहस्तही देण्यात आले आहे. परिसर स्वच्छ व निरोगी ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले.
२०१२ साली आपण निवडून आल्यानंतर साखळीचा बसस्थानक, नगरपालिका प्रशस्त इमारत, पोलिस आऊट पोस्टची इमारत, सर्व मुख्य नाले, स्विमिंग पूल, इंडोर क्रीडा प्रकल्प, रवींद्र भवन हे प्रकल्प चालीस लागले. शहर नियोजन आराखड्यानुसार सुपाचीपुड ते सरकारी सामाजिक इस्पितळापर्यंतचा रस्ता रुंद करण्याचे काम सुरू आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री