

पणजी : पुढारी वृत्तसेवा
रायबंदर बगल रस्त्याच्या जवळ चिंबल पंचायत क्षेत्रात होऊ घातलेल्या युनिटी मॉलच्या बंधकामाला गुरुवारी (दि. २५) चिंबलच्या नागरिकांनी पुन्हा विरोध केला. सिटी मॉलविरोधातील आंदोलन भविष्यात अधिक तीव्र होणार असून रविवार, २८ रोजी प्रकल्पासमोर उपोषण करण्याचा व ४ जानेवारी रोजी मोर्चा काढण्याचा इशारा चिंबलवासीयांनी दिला आहे.
जिल्हा निवडणुकीची पंचायतीच्या आचारसंहिता संपल्यानंतर येथे गुरुवारपासून काम सुरू करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे सुरू केला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील ३५ ते ४० नागरिक नियोजित मॉलच्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी मॉलच्या कामाला विरोध केला.
पंचायतीची परवानगी नसताना काम सुरू कसे होते, असा प्रश्न शिरोडकर यांनी विचारला असता मामलेदारांनी पंचायत खात्याने बांधकामाला परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र, यावेळी अजय खोलकर यांनी न्यायालाने कामाला स्थगिती दिल्याचे सांगून काम सुरू करण्यास मज्जाव करत मामलेदारांशी हुज्जत घातली.
मामलेदारानी स्थगिती आदेश दाखवा, अशी सूचना केल्यामुळे हा वाद वाढला. शेवटी उपोषण व मोर्चाचा इशारा शिरोडकर व खोलकर यांनी दिला.
जैवविविधता होणार नष्ट
नियोजित मॉलजवळच नैसर्गिक तळी आहे. या मॉलसाठी तेथे असलेली झाडे कापली जाणार आहेत. येथील जैवविविधता नष्ट होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथे नको, अशी मागणी यावेळी शिरोडकर यांनी केली.