

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोमंतकीयांच्या सण परंपरेतील वर्षातील शेवटचा आणि आनंदाची उधळण करणाऱ्या नाताळाला गोव्यात मिडनाईट मासने सुरुवात झाली. नाताळच्या पूर्वसंध्येलाच उत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.
राज्यभरातील सर्व चर्चमध्ये मध्यरात्री या मासला सुरुवात होऊन ते रात्री उशिरापर्यंत चालू होते. आजपासून गोव्यासह संपूर्ण जगभरात नाताळाची धामधूम सुरू झाली आहे. पणजीच्या सेंट इमॅक्युलेट, जुने गोवेतल्या सेंट फ्रान्सिस झेवियर, बासिलिका ऑफ बाम जीजस, बिशप पॅलेस, डॉन बॉस्को व इतर चर्चेसमध्ये हजारो लोकांनी मिडनाईट मासमध्ये सहभागी होऊन येशू जन्मोत्सव साजरा केला.
नाताळाच्या पूर्वसंध्येचा दिवस सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पणजीसह राज्यभरात सर्व शहरांमध्ये तसेच सर्व समुद्रकिनाऱ्यावर विद्युत रोषणाई करून नाताळचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पर्यटकही नाताळ साजरा करण्यासाठी या काळात गोव्यात दाखल होतात. हे सेलिब्रेशन पुढे नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत चालू राहणार आहे.