

पणजी : पुढारी वृत्तसेवा
धक्क्यावर पणजीतील फेरी रात्रीच्या सुमारास बेकायदा पार्क केलेली महाराष्ट्र राज्यात नोंदणी केलेली एक कार भरतीच्या पाण्यामुळे अर्धवट बुडाली. ओहोटीची कल्पना न आल्याने रात्री गाडी उभी करून चालक बाहेर गेला आणि भरतीमुळे पाण्याचा स्तर वाढल्याने ही दुर्घटना घडली.
क्रेनच्या सहाय्याने शुक्रवारी सकाळी गाडी बाहेर काढण्यात आली. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र, बेकायदा पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुर्घटनेनंतर नदी परिवहन खात्याचे मंत्री आणि संचालकांनी ती जागा आपल्या खात्याची असल्याने पार्किंगच्या नावाखाली पर्यटक आणि कॅसिनोकडून होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी पूर्णवेळ खासगी सुरक्षारक्षक नेमण्याची ग्वाही दिली.
संचालक, पोलिसांशी बोलून पुढील निर्णय
बेकायदा पार्किंग केलेली जागा आमची आहे. तिथे पर्यटक आणि कॅसिनोच्या गाड्या लागतात. पण, आम्ही त्या काढू शकत नाहीत. त्यांना चलन देण्याचा, त्या उचलून नेण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना आहे. त्यांच्याशी चर्चा करण्याबरोबरच कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय नदी परिवहन विभागाच्या संचालकांसोबत बैठक घेऊन घेण्यात येईल, अशी माहिती नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
त्या जागी दिवसा वीज खात्याच्या आणि रात्री पर्यटक व कॅसिनोच्या गाड्या बेकायदा पार्क केल्या जातात. त्यामुळे दुर्घटनेला गाड्या लावणारे जबाबदार ठरतात. तथापि, बेकायदा पार्किंग रोखण्यासाठी महिनाभरात त्या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्यात येईल.
- विक्रमसिंह राजेभोसले, संचालक, नदी परिवहन खाते.