

चिंबलमध्ये युनिटी मॉल व प्रशासकीय टॉवरविरोधात भव्य आंदोलन
अॅड. अमित पालेकर यांचा सरकारविरोधात आवाज उठवण्याचा स्पष्ट इशारा
पर्यावरण ऱ्हास आणि कॉर्पोरेट लॉबीवर जोरदार टीका
विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनाला पाठिंबा
चिंबल : पुढारी वृत्तसेवा
एसटी, ओबीसींच्या काही नेत्यांनी आपला समाज हा भाजपच्या दावणीला बांधला आहे. पण यापुढे हे होऊ देणार नाही. चिंबलच्या ऐक्याच्या निमित्ताने आता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. म्हणून गोव्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास, कॉर्पोरेट लॉबीला साथ देणाऱ्या या भाजप सरकारच्या विरोधात आता आवाज उठवायला हवा.
भाजप सरकार विरोधातली चिंबलमध्ये पेटलेली ही मशाल गोव्याच्या कानाकोपऱ्यात पेटवा, असे आवाहन केले. अॅड. अमित पालेकर यांनी चिंबल येथे रविवारी गोवा भाजप सरकारच्या विरोधात भव्य जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरकार पुरस्कृत युनिटी मॉल आणि प्रशासकीय टॉवरच्या विरोधात चिंबलकरांच्या या आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
स्थानिकांचा हा लढा आपला मानून सरकारविरोधी बाकावरील सर्वच पक्षांनी या आंदोलनात हजेरी लावली. यावेळी अमित पालेकर, आंदोलनाचे संयोजक गोविंद शिरोडकर, अॅना ग्रेसियस, निकिता मारडोलकर, ब्रायन गोंसाल्विस आप अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष सर्फराज शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, शंकर पोळजी, मारियानो फेराव यांच्यासह चिंबल सरपंच समर्थक गट वगळता पंचायतीचे ४ सदस्य उपस्थित होते.