

काणकोण : पुढारी वृत्तसेवा
लांबलेल्या पावसामुळे काणकोण तालुक्यातील मिरचीसह अन्य पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मिरची आणि विविध फळभाज्यांची लागवड केली होती. मात्र, पाऊस न झाल्याने सध्या त्यांना दूरवरून पाणी आणून पिकांना जीवदान द्यावे लागत आहे.
साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत सुरू करतात. यंदा मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप शेतीची कामेही लांबणीवर पडली आहेत. खोतीगावसह अन्य भागांतील जलसाठे कोरडे पडल्याने गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील नाणे, इंद्रावाडा, कुडेवाडा आणि इतर वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
दरम्यान, चापोली धरण जलाशयातील पाण्याची पातळीही सातत्याने घटत आहे. त्यामुळे काणकोण तालुक्यात जलसंकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चापोली धरणाची पाणी साठवण क्षमता १,१२२ हेक्टोमीटर (३८.७५ रिस्टर) असून सध्या जलाशयात केवळ ४५६ हेक्टोमीटर पाणीसाठा शिल्लक आहे.
काणकोण शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. मान्सूनचे आगमन झाले असले तरी तो अद्याप पूर्णपणे स्थिरावलेला नाही. हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील उष्णता अधिक तीव्रतेने जाणवत आहे. सकाळपासूनच उकाड्याची तीव्रता वाढत असून बाजारपेठेत जाणे, दैनंदिन कामे करणे आणि घराबाहेर वावरणे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती असून नागरिक नियमित आणि समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, शेतीच्या कामांना विलंब होत असल्याने बळीराजाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.