

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात मान्सून लांबल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत आटत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी वाढत आहे. भोजापूर, उंबरदरी, सरदवाडी, बोरखिंड यांसह अनेक धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय घट झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पंचायत समितीच्या दि. ४ ते १० जून २०२६ या कालावधीतील साप्ताहिक अहवालानुसार तालुक्यातील ८ गावे व ७१ वाड्या - वस्त्यांमध्ये १८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, सुमारे ३७हजार ४७१ लोकसंख्येला लाभ मिळत आहे. दररोज ४१ टँकर खेपा केल्या जात आहेत.
टंचाईची तीव्रता लक्षात घेता, आणखी काही गावांकडून टँकरची मागणी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मान्सूनचे आगमन आणखी लांबल्यास पाणीपुरवठ्यावरील ताण वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याबरोबरच पर्यायी स्रोतांचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष आता पावसाकडे लागून आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेली गावे
तालुक्यातील पाटपिंप्री, निहऱ्हाळे फत्तेपूर, धारणगाव, सुळेवाडी, फर्दापूर, सोनारी, सोनांबे, वडगाव सिन्नर आदी गावांसह वाड्या - वस्त्यांना पंचाय समितीमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात पाटपिंप्री - चिंचमळा, पाटलाची वस्ती, आंबरे मळा, कारवाडी, सातपुते वस्ती, रामोशीवाडी.
निहऱ्हाळे फत्तेपूर - शिंदे व - मोंढे वस्ती, गोरेवाडी, एकलव्यनगर, बोगदेवाडी. धारणगाव - सडकाची वस्ती, बेगेवाडी, शिक्रेवाडी, रबुदेवाडी, कराड वस्ती, साबळेवाडी. सुळेवाडी जाधव- गुगळे वस्ती, वाघसांगळे, केकाण, दराडे, शिंगाडे वस्ती. फर्दापूर- पवारवाडी व परिसर. सोनारी जयप्रकाशनगर-गायकवाड, पावले, धसे, हलवर वस्ती, अहिल्यानगर, रोहिदासनगर. सोनांबे, मलढोण, आव्हाड, इलग, दराडे वस्ती. वडगाव सिन्नर-आव्हाड व सांगळे वस्ती, ढोकी वस्ती, दत्तवाडी, खताळे, शिंदे वस्ती, कुन्हे वस्ती, आढाव वस्ती
मोसमी पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाई तीव्र होत आहे. तथापि, आवश्यकता असलेल्या गावांना प्राधान्यक्रमाने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत सुरू आहे. शुक्रवारी आणखी आठ वाड्या-वस्त्यांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले.
- अशोक भवारी, गटविकास अधिकारी