Goa Stray Cattle in Building | सरकारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर वासरू, अपूर्णावस्थेतील इमारतीत मोकाट गुरांचा संचार

केपेतील कुसगण येथील प्रकार; अपूर्णावस्थेतील इमारतीत मोकाट गुरांचा संचार
केपे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेलेले वासरू.
केपे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेलेले वासरू.
Published on
Updated on
Summary
  • सहा वर्षापासून रखडला प्रकल्प

  • 'साबांखा'च्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित

  • नवीन पोलिस स्थानकाचे बांधकाम प्रस्तावित

मडगाव : केपे तालुक्यातील कुसमण येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन पोलिस स्थानकाच्या रखडलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चक्क एक वासरू पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपूर्ण अवस्थेतील सरकारी इमारतीत जनावरांचा मुक्त संचार होत असल्याचे चित्र समोर आल्यानंतर सहा वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचा बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात येणारे पोलिस स्थानकच असुरक्षित अवस्थेत उभे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कुसमण येथे आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन पोलिस स्थानक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने वाढती लोकसंख्या, केपे तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या गरजा आणि जुन्या पोलिस स्थानकाची अपुरी जागा लक्षात घेऊन घेतला होता. बहुमजली इमारतीमध्ये पोलिस कार्यालय, तपास कक्ष, महिला कक्ष, रेकॉर्ड विभाग, कर्मचारी निवास आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मोठ्या अपेक्षेने या प्रकल्पाचे काम सुरू झाले; मात्र आजही ही इमारत पूर्णत्वास गेलेली नाही.

केपे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेलेले वासरू.
Goa Mandrem Coast Vehicles | मांद्रे किनारपट्टीवर नंबर प्लेटविना वाहनांचा वावर

बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाया, स्तंभ आणि मुख्य आरसीसी संरचना वेगाने उभारण्यात आली. इमारतीचे तीन मजले उभे राहिले; परंतु त्यानंतर कामाचा वेग अचानक मंदावला. अंतर्गत बांधकाम, प्लास्टर, फरशी, विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, खिडक्या-दरवाजे, रंगकाम आणि इतर अंतिम कामे रखडली. यामागे निधी उपलब्ध होण्यात झालेला विलंब, कंत्राटी प्रक्रियेतील अडथळे आणि प्रशासकीय मंजुरीसाठी लागलेला वेळ ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात होते. काही काळ कंत्राटदार बदलण्याची प्रक्रियाही सुरू होती. त्यामुळे प्रकल्प जवळपास दोन वर्षे ठप्प अवस्थेत राहिला आहे.

केपे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेलेले वासरू.
Goa Tourism Law | पर्यटन खात्यातर्फे लवकरच रॉकचे वाटप

दरम्यान, रखडलेल्या इमारतीची कोणतीही नियमित देखभाल झाली नाही नसून परिसराला पूर्णपणे कुंपण घालण्यात आलेले नाही. इमारतीच्या उघड्या मजल्यांवर सुरक्षा कठडेही बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे जनावरे, लहान मुले किंवा इतर व्यक्तींना बांधकामस्थळी सहज प्रवेश मिळत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. याच निष्काळजीपणाचे उदाहरण सोमवारी समोर आले.

एका वासराने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत मजल मारल्याचे दिसून येताच खळबळ उडाली. खाद्याच्या शोधात वासरू इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उघड्या स्लॅबच्या कडेला वासरू उमे असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकली असती. पोलिस स्थानकाच्या इमारतीत अशी परिस्थिती निर्माण होणे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

पोलिस यंत्रणेला प्रतीक्षा

कुसमण पोलिस स्थानकाचे काम रखडल्याने केपेतील पोलिस यंत्रणेलाही त्याचा फटका बसत आहे. सध्या अपुऱ्या जागेतून कामकाज सुरू असल्याने नागरिकांना विविध सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन इमारत कार्यान्वित झाल्यास पोलिस प्रशासनाला अधिक जागा आणि आधुनिक सुविधा मिळणार होत्या; मात्र विलंबामुळे हा लाभ अद्याप मिळालेला नाही.

आमदार डिकॉस्ता यांचा जनआंदोलनाचा इशारा

या प्रकल्पाच्या विलंबावरून केपेचे आमदार अल्टोन डिकोस्टा यांनीही सरकारवर अनेकदा टीका केली आहे. रखडलेल्या कामाला तातडीने गती द्यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वासरू तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्याच्या घटनेनंतर आता नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गृह खात्याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

या मागण्यांकडे वेधले लक्ष

संपूर्ण परिसराला मजबूत बॅरिकेडिंग करणे, उघड्या मजल्यांवर संरक्षण कठडे बसविणे आणि सहा वर्षांपासून रखडलेल्या कुसमण पोलिस स्थानकाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून इमारत नागरिकांच्या सेवेत आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news