Goa Mandrem Coast Vehicles | मांद्रे किनारपट्टीवर नंबर प्लेटविना वाहनांचा वावर

पर्यटकांच्या भरधाव दुचाकींमुळे चिंता; वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचा सवाल
पेडणे : मांद्रे येथील रस्त्यावर नंबर प्लेटविना फिरणारी दुचाकी.
पेडणे : मांद्रे येथील रस्त्यावर नंबर प्लेटविना फिरणारी दुचाकी.
Published on
Updated on

पेडणे : एका बाजूला पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसऱ्या बाजूला मांद्रे मतदारसंघातील पर्यटनप्रधान किनारपट्टीच्या रस्त्यांवर नंबर प्लेट नसलेल्या अथवा अस्पष्ट नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा वावर नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. काही देशी-विदेशी पर्यटकांकडून दुचाकी वाहने भरधाव वेगाने चालविली जात असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. अशा वाहनांची नियमित तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

केरी, हरमल, मांद्रे आणि मोरजी या समुद्रकिनारी भागांत वर्षभर देशी विदेशी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पर्यटनासाठी आलेले अनेक पर्यटक दुचाकी तसेच चारचाकी वाहने वापरतात. मात्र, काही वाहनांवर पुढील किंवा मागील नंबर प्लेट नसल्याचे, तर काही वाहनांच्या नंबर प्लेटवरील क्रमांक स्पष्टपणे वाचता येत नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाहनाला अधिकृत आणि स्पष्ट नोंदणी क्रमांक असणे ही केवळ तांत्रिक बाब नाही, तर रस्ते सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाची बाब आहे. अपघात करून एखादे वाहन घटनास्थळावरून निघून गेले किंवा एखाद्या बेकायदेशीर कृत्यात अशा वाहनाचा वापर झाला, तर नंबर प्लेटच नसेल किंवा नंबर अस्पष्ट असेल तर संबंधित वाहनाची तत्काळ ओळख कशी पटवायची? असा रास्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

किनारी भागात पोलिस आणि वाहतूक विभागाची यंत्रणा कार्यरत असतानाही नंबर प्लेट नसलेली वाहने रस्त्यावर येतातच कशी? अशी वाहने तपासणी नाक्यांमधून कशी निसटतात? संबंधित वाहनमालकांची जबाबदारी निश्चित केली जाते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाने देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मोरजी ते पार्से मार्गावर एका विदेशी पर्यटकाकडून चालविण्यात येत असलेली दुचाकी भरधाव वेगाने जात असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला.

पेडणे : मांद्रे येथील रस्त्यावर नंबर प्लेटविना फिरणारी दुचाकी.
Goa Tourism Law | पर्यटन खात्यातर्फे लवकरच रॉकचे वाटप

या दुचाकीच्या मागील बाजूस नंबर प्लेट दिसत नव्हती, तर पुढील बाजूचा क्रमांकही स्पष्टपणे वाचता येत नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित वाहनाची वस्तुस्थिती वाहतूक पोलिसांनी पडताळून पाहावी आणि नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणात वाहतूक पोलीस नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.

किनारपट्टीत आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला जात आहे. खासगी नोंदणीची वाहने पर्यटकांना कथितरीत्या भाडेतत्त्वावर दिली जात आहेत का, याची संबंधित यंत्रणांनी स्वतंत्र चौकशी करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत. वाहनाची नोंदणी कोणाच्या नावावर आहे, त्याचा प्रत्यक्ष वापर कोण करीत आहे, वाहन व्यावसायिक कारणासाठी वापरण्यास आवश्यक परवानगी आहे का, विमा आणि इतर कागदपत्रे वैध आहेत का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. नियमबाह्य पद्धतीने खासगी वाहने भाड्याने देण्याचा प्रकार सुरू असेल, तर केवळ वाहन चालविणाऱ्या पर्यटकावर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. अशी वाहने उपलब्ध करून देणाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पेडणे : मांद्रे येथील रस्त्यावर नंबर प्लेटविना फिरणारी दुचाकी.
Goa Police suspension: भ्रष्टाचार अन् गैरवर्तन... गोवा पोलीस दलातील ५ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; नक्की काय घडलं?

अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का ?

किनारी रस्त्यांवर स्थानिक नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पर्यटक आणि कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची सातत्याने वर्दळ असते. अशा परिस्थितीत भरधाव वाहने आणि ओळख पटणे कठीण असलेली नंबर प्लेटविरहित वाहने हा केवळ वाहतूक नियमभंगाचा विषय न राहता सार्वजनिक सुरक्षेशी निगडित प्रश्न बनतो. एखादा गंभीर अपघात किंवा अनुचित घटना घडल्यानंतर यंत्रणा जागी होण्यापेक्षा आताच प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कारवाई करणार : चोडणकर

पेडणेचे वाहतूक पोलिस निरीक्षक विश्वजीत चोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मांद्रे परिसरात कोणी नंबर प्लेटविना वाहन चालविल्याची कोणतीही तक्रार दाखल नाही. मात्र, समाज माध्यमांवर फिरणाऱ्या व्हिडीओंची दखल घेत संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

विशेष मोहीम राबवा; वाहनांची तपासणी करा

मोरजी, मांद्रे, हरमल आणि केरी या किनारीपट्ट्यात वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस यांनी संयुक्त विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी पुढे येत आहे. नंबर प्लेट नसलेली, अस्पष्ट किंवा नियमबाह्य नंबर प्लेट असलेली वाहने, आवश्यक कागदपत्रांशिवाय चालविली जाणारी वाहने तसेच खासगी वाहनांचा व्यावसायिक वापर होत असल्याचा संशय असलेल्या प्रकरणांची तपासणी व्हावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news