

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमधील भीषण आगीच्या दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या क्लबच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी म्हापसा न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली, तर संशयित अजय गुप्ता याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेले लुथरा बंधूंची कसून चौकशी सुरू असून नाईट क्लबला कोणाचा आशीर्वाद होता, हे शोधण्याचे काम सध्या सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेप्रकरणी नाईट क्लबच्या व्यवस्थापकीय कर्मचारी राजीव मोडक, प्रियांशू ठाकूर, राजवीर सिघानिया व विवेक सिंग यांना रविवारी ७ डिसेंबरला अटक केली होती.
या क्लबचे काम पाहणारे देखरेख अधिकारी संशयित भरत सिंग कोहली याला दिल्लीतून अटक झाली होती. या पाचही जणांना पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात लुधरा बंधूंचे व्यावसायिक भागीदार अजय गुप्ता यालाही दिल्लीतून अटक झाली होती. ते सध्या पोलिस कोठडीत असून त्यांनी गुरुवारी न्यायालयासमोर आरोग्याच्या कारणावरून जामीन देण्याची विनंती केली होती.
न्यायालयाने त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या लुथरा बंधूंची हणजूण पोलिस स्थानकात त्यांच्याकडे असलेल्या नाईट क्लबच्या परवान्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. त्यांनी बनावट करारपत्र तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री तसेच ती कोणी केली, याचा तपास पोलिस करत आहेत.
नाईट क्लबला कोणाचा आशिर्वाद होता. ते आजारी होते तर थायलंडला पलायन करण्यामागील कोणते कारण होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी असून नाईट क्लबसाठी आवश्यक असलेले परवाने घेण्याची जबाबदारी कोणाची होती याचाही तपास पोलिस करत आहेत.