

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी २० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा जाहीर प्रचार गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता समाप्त झाला. त्यामुळे पुढील दोन दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे. या काळात मतदारांना आमिष देण्याचे प्रकार घडू नयेत व निवडणूक सुरळीत पार पडावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने भरारी पथके तैनात केली आहेत मार्च - एप्रिल २०२७ मध्ये गोवा विधानसभेची निवडणूक होणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पंचायत निवडणूक ही विधानसभेची सेमीफायनल मानली जात आहे. त्यासाठीच त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विधानसभेला जेवढे मतदार मतदान करतात त्यापेक्षा कमी मतदार जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान करतात.
जिल्हा पंचायतीला पालिका क्षेत्रे वगळली जातात. त्यामुळे मतदारांची संख्या कमी होते. चौरंगी लढती यावेळी भाजप-मगो युती, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती, रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजी) आणि आम आदमी पक्ष या अशा चार पक्षांमध्ये लढत होणार आहे. बहुतांश जागी या चारही पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत.
काही ठिकाणी अपक्ष तुल्यबळ आहेत. त्यामुळे जिल्हा पंचायतीसाठीच्या चौरंगी लढतीत कोण बाजी मारतो ते २२ डिसेंबरला मतमोजणीनंतर कळणार आहे. ८,६९, ३५६ मतदार : जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी ८,६९, ३५६ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. त्यात ४,२०,६०६ पुरुष व ४,४८, ७४५ महिला मतदार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी १,२८४ मतदान केंद्रे स्थापन केली असून दक्षिण गोव्यात प्रत्येकी ९ नियंत्रक, निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. उत्तर गोव्यासाठी ही संख्या ६ आहे. आपचे सर्वात जास्त ४२ उमेदवार जिल्हा पंचायतीच्या ५० जागा आहेत.
एकही पक्ष सर्वच्या सर्व जागा लढवत नाही. आम आदमी पक्षाने सर्वात जास्त ४२ उमेदवार उभे केले आहेत. त्याखालोखाल भाजप ४०, काँग्रेस ३६, आरजी ३०, गोवा फॉरवर्ड ९, मगो ३, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ३ व अपक्ष ६३ असे २२६ उमेदवार ५० जागांसाठी उभे आहेत.
मतदान केंद्रापासून १०० मीटर परिसरातील उपहारगृहे बंद
मतदारसंघांतील मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात असलेली सर्व रेस्टॉरंट्स, बार, चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या, खानावळी, ढाबे व गाड्यांवरील खाद्यविक्री केंद्रे मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आदेशानुसार, ही सर्व खाद्यगृहे २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहतील. तसेच २२ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी, मतमोजणी केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील खाद्यगृहे सकाळी ६ वाजल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
याशिवाय, जिल्हा पंचायत मतदारसंघांतील मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या आदेशात नमूद केलेल्या काही अपवादांना सूट देण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.