गोवा : भाजपचा सोमवारी विजयोत्सव

गोवा : भाजपचा सोमवारी विजयोत्सव

पणजी : पुढारी वृत्तसेवा
येत्या सोमवारी (दि.28) बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सकाळी अकरा वाजता होणारा राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी हा प्रत्यक्षात भाजपसाठी विजयोत्सव असणार आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघातून भाजप नेते, कार्यकर्त्यांनी अगदी वाजत गाजत कार्यक्रमस्थळी येण्याचे नियोजन केले आहे. शासकीय आणि पक्षाचाही असे या सोहळ्याचे स्वरूप राहील. ग्रामपंचायतींच्या निवडणुकींच्या प्रचाराचा नारळ या विजयोत्सवामध्ये फोडला जाईल. सोहळ्यासाठी मतदारसंघातून कार्यकर्ते एकत्रितपणे वाहनांतून निघणार आहेत. आमदार असलेल्या ठिकाणी आमदार आणि आमदार नसलेल्या मतदारसंघातून तेथील स्थानिक नेता वाजत गाजत कार्यक्रमस्थळी येण्यास निघतील. त्याशिवाय मतदारसंघात आणि तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या पडद्यावर हा कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था आहे. एकंदरीत राज्यभरात भाजपमय वातावरण करण्याची तयारी सुरु आहे.

येत्या दोन महिन्यांत राज्यात पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढवल्या जात नसल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते अहमिकेने त्यात उतरत असतात. निवडणुकीनंतर इतक्या पंचायती आमच्याकडे असे दावेही राजकीय पक्षांकडून केले जातात. त्यामुळे भाजपने याखेपेला 2024 मधील लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या स्थानिक स्वराज्य संस्थांत कार्यकर्ते जास्तीत जास्त प्रमाणात विजयी व्हावेत, अशी रणनीती तयार केली आहे. त्याची सुरुवात या विजयोत्सवापासून होईल.

गुरुवारी (दि.24) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्टेडियमवर जाऊन शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतला, यावरून भाजप या सोहळ्याला किती महत्त्व देते हे लक्षात येते. राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी हा जनतेचा उत्सव करण्याचे सरकारने ठरवले आहे. विधानसभा निवडणुकीत दहा वर्षे सत्तेत असतानाही भाजपला जनतेने 40 पैकी 20 जागा दिल्याने भाजपच्या गोटात खुशीचे वातावरण आहे. या आनंदात जनतेला सहभागी करून घेत हा विजय साजरा करण्याचे भाजपने ठरवले आहे.

दोन निमंत्रण पत्रिका

या सोहळ्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वरच्या बाजूला पंतप्रधानांचे नाव ठळक आहे. त्या खालोखाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचे नाव आहे. पक्षाच्या वतीने जारी केलेल्या या निमंत्रण पत्रिकेचे निमंत्रक प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आहेत. याशिवाय सरकारी पातळीवर वेगळी अधिकृत निमंत्रण पत्रिकाही वितरित केली आहे.

पंतप्रधानांसह नेत्यांची मांदियाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी, शेजारील राज्यातील भाजपचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहतील. अतिमहनीय व्यक्तींच्या प्रवासासाठी बांबोळी येथे हेलिपॅड उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. सभागृहाच्या आतील भागातील सजावटीचे काम सुरू झाले आहे. मंच आणि परिसर गोमंतकीय वाटावा यासाठी त्याचे कंत्राट दिले आहे. एरवी हे काम सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याकडून केले जाते. मात्र याखेपेला हा सोहळा विजयोत्सव असल्याने त्याला साजेशी सजावट व रचना सुरू आहे.

सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड यांच्यासह गुरुवारी शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणाची पाहणी केली. राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना तयारीबाबत माहिती दिली. यावेळी पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला उपस्थित होते. अतीमहनीय व्यक्ती एकाचवेळी एकाच ठिकाणी एकत्र येणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या विविध सुरक्षा यंत्रणांच्या अधिकार्‍यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थळाची पाहणी सुरू केली आहे. राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांची सचिवालयात बैठक घेतली. त्यामध्ये अधिकार्‍यांच्या जबाबदारींची निश्चिती केली. त्याची रंगीत तालीम गुरुवारी घेण्यात आली. प्रत्येक महनीय व्यक्तीसोबत एक राजशिष्टाचार अधिकारी, एक स्थानिक कार्यकर्ता असेल असे नियोजन आहे.

किती मंत्री शपथ घेणार?

पंतप्रधान शपथविधी सोहळ्यानंतर जनतेला संबोधित करतील का याविषयी निश्चित काही ठरले नाही. किती मंत्री शपथ घेतील हेही ठरलेले नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मंत्र्यांची यादी रविवारी

चाळीस सदस्यांच्या विधानसभेत बारा जणांचे मंत्रिमंडळ असते. मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश असेल याविषयी अस्पष्टता कायम आहे. मुख्यमंत्री पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून मंत्रिमंडळाची यादी रविवारी (दि.27) निश्चित करतील अशी माहिती मिळाली आहे. तोवर केवळ चर्चा सुरू असेल.

विविध संप्रदायांच्या धर्मगुरूंना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेशिका घेऊन लोकांनी सकाळी 10 वाजण्यापूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. केवळ अर्ध्या तासाचा सोहळा असेल. उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. -डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news