BITS Pilani Goa News| बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या, दोन वर्षांत पाच मृत्यूंमुळे गंभीर प्रश्न उपस्थित
दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
सांकवाळ-झुआरीनगर येथील बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या वैष्णवी जितेश या वीस वर्षीय विद्यार्थिनीने रविवारी (दि. १) गळफास घेऊन आत्महत्या केली. या कॅम्पसमध्ये डिसेंबर २०२४ ते एक फेब्रुवारी २०२६ दरम्यान पाच विद्यार्थ्यांनी विविध कारणास्तव आपले जीव गमावले आहेत. आता या कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीने आहे.
सदर आत्महत्या आत्महत्या करण्याची पहिलीच घटना असल्याने सदर कॅम्पस चर्चेत आले विद्यार्थिनीने करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारण काय याचा तपास करण्याची गरज आहे. वैष्णवी हि बंगळुरू कर्नाटकची असून ती बिट्स पिलानीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.
वैष्णवी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती. त्यामुळे पालकांच्या सानिध्यात राहिली तर तणाव दूर होईल यासाठी ती आपल्याकडे अलिकडे गेली होती. तेथून परतल्यावर ती वरवर तणावमुक्त दिसत होती. सध्या या कॅम्पसमध्ये क्रीडा मेळावामुळे विद्यार्थी मैदानावर असतात. त्यामुळे नियमित वर्ग घेण्यात येत नसल्याचे समजते. रविवारी सायंकाळी वैष्णवी ही मैत्रिणींबरोबर न राहता आपल्या खोलीमध्ये परतली होती. त्यानंतर रात्रीच्या वेळी ती जेवणासाठी बाहेर न पडल्याने मैत्रिणींनी तिला आवाज दिला.
मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापनाला कळविण्यात आल्यावर खोलीचे दार उघडण्यात आले. वैष्णवी हिने चादरीचे एक टोक छत्याच्या पंख्याला गुंडाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी बिट्स पिलानीचे जनसंपर्क अधिकारी अर्जुन हळणकर यांनी वेर्णा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून अनैसर्गिक मृत्युची नोंद केली.
तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आला. याप्रकरणी वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर पुढील तपास करीत आहेत. ती कोणत्या कारणास्तव मानसिक तणावाखाली होती, तीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारण काय याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. यापूर्वी ओम प्रियान सिंग याने डिसेंबर २०२४ मध्ये आत्महत्त्या केली होती. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये अथर्व देसाई याच्या आत्महत्तेने कॅम्पस हादरले होते.
त्यानंतर दोन महिन्यानंतर म्हणजे मे २०२५ मध्ये कृष्णा कासेरा याने आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबाने काही आरोप केले होते. ऑगस्ट २०२५ मध्ये कुशाग्र जैन (२०) हा कॅम्पसमधील होस्टेलच्या खोलीत मृतावस्थेत सापडला होता. चार सप्टेंबर २०२५ला ऋषी नायर हा कॅम्पसमधील होस्टेलच्या खोलीत मृतावस्थेत सापडला होता. बंगळूर येथे राहणारा ऋषी नायर हा तणावाखाली असल्याने हैद्राबादच्या बिट्स पिलानीतून ऑगस्ट २०२५मध्ये गोवा कॅम्पसमध्ये आला होता.
वैयक्तिक कारणास्तव त्याला नैराश्य आल्याने तो तणावाखाली होता. त्यामुळे तेथे त्याच्यावर मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार सुरु होते. तेथे राहिल्यास त्याचा तणाव आणखी वाढण्याची भिती असल्याने त्या मानसोपचार तज्ज्ञाने त्याच्या पालकांना त्याची दुसरीकडे शिक्षणाची सोय करण्याची सूचना केली होती.
त्यामुळे त्याने हैद्राबाद बिट्स पिलानी कॅम्पसमधून गोवा कॅम्पसमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र येथेही तो तणावाखाली होता. त्याला तणावातून बाहेर काढण्यासाठी व त्याच्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्या पालकानी येथे एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्याचे पालक दररोज सायंकाळी येऊन त्याच्याशी बोलत होते.
त्याला त्या दिवशाचे औषध देऊन ते आपल्या फ्लॅटवर परतत असे. एवढी खबरदारी घेऊनही तो मृतावस्थेत सापडला. त्याला कोणत्या कारणास्तव मृत्यू आला हे स्पष्ट झाले नव्हते. कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी तत्कालीन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी दखल घेताना संपूर्ण अहवाल मागितला होता.
याप्रकरणी गोवा विधानसभेतही बिट्स पिलानीचा प्रश्न चर्चेत आला होता. जिल्हाधिकारी क्लिटस यांनी सांगितले की, विद्यार्थिनीचे पालक गोव्यात येत असून, त्यानंतरच शवविच्छेदन केले जाईल. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विद्याथ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने दक्षिण गोवा जिल्हा समिती स्थापन केली आहे. या समितीने वेळोवेळी संस्थेतील उपाययोजनांचा आढावा घेऊन ऑनलाइन समुपदेशन केंद्र व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. संस्थेने त्या अनुषंगाने काही बदलही केले होते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्रथमदर्शनी आत्महत्या :
बिट्स पिलानी संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहात २० वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असला, तरी प्राथमिक चौकशीत हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी दिली.

