Goa Nightclub Fire Case | नाईटक्लब आगीत दोषी ठरलेले माजी सरपंच रोशन रेडकर भूमिगत; पोलिसांची शोधमोहीम
पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील दुर्घटनाप्रकरणी हणजूण पोलिसांनी हडफडे-नागोआचे माजी सरपंच रोशन रेडकर व पंचायतीचे बडतर्फ माजी सचिव रघुवीर बागकर यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी रेडकर यांच्या निवासस्थानी छापा टाकला असता ते तेथे सापडले नाहीत. त्यांच्या निवासाच्या आसपास साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोशन रेडकर व रघुवीर बागकर यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार होते. मात्र ते घरी नसल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
त्यामुळे अटकेच्या भीतीने तो भूमिगत झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांशी तसेच मित्रमंडळींशी पोलिसांनी चौकशी केली. मात्र ठोस उत्तर मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लीच दंडाधिकारी चौकशी अहवालात माजी सरपंच रोशन रेडकर हे दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांना सरपंचपदावरून अपात्र करण्यात आले आहे.
माजी सचिव यांनी व्यापार परवाना देताना आवश्यक असलेल्या परवानग्यांची शहानिशा केली नसल्याचे चौकशी अहवालात उघड झाले आहे. या दोघांना अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ते गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परवानग्या, सुरक्षितता नियम आणि जबाबदारी निश्चित करण्याबाबत सखोल तपास सुरू केला आहे. हणजूण पोलिस या प्रकरणातील सर्व संबंधितांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

