पणजी: मांगेली फणसवाडी (दोडामार्ग, सिंधुदुर्ग) येथील 49 वर्षीय विष्णू लाडू गवस यांना अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली आहे. मंगळवार, 10 जून रोजी सकाळी 6:30 ते 7:00 वाजण्याच्या दरम्यान, ते धबधब्याजवळ रस्त्यालगत असलेल्या झाडावरून फणस काढण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामुळे त्यांचा हात आणि कमरेखालील भाग जखमी झाला.
जखमी असूनही, विष्णू गवस यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड सुरू ठेवली, त्यामुळे अस्वल धूम ठोकले. त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देत गावातील लोक धावत आले आणि त्यांनी त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत गुरव यांनी त्यांना प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वटपौर्णिमेच्या सणानिमित्त फणस काढण्यासाठी गेलेल्या विष्णू गवस यांना झाडाच्या बाजूला असलेले अस्वल फणस खात असल्याची कल्पना नव्हती. अचानक हल्ला झाल्याने ते बेसावध असताना अस्वलाने त्यांच्यावर झडप घातली आणि गवस यांचे उजवे पाय आणि डावे हात जखमी झाले.