

पणजी : बाबूश मोन्सेरात सांताक्रुजमध्ये महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपला पूर्वाश्रमीचा विधानसभा मतदारसंघ आपले जुने कार्यालय अनेक वर्षांनंतर पुन्हा खुले केले आणि चर्चेचा विषय ठरला आहे. मोन्सेरात यांनी शुक्रवारी कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. दर रविवारी मोन्सेरात या कार्यालयात बसणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी सांताक्रुजमध्ये भाजपचा उमेदवार जिंकणार आहे, असा दावाही त्यांनी केल्यामुळे सांताक्रुझमध्ये बाबूश यांची 'एन्ट्री' झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले की, आपण आपले सांताक्रुझमधील जुने कार्यालय पुन्हा उघडले आहे. आपण भारतीय जनता पक्षाचा नेता नव्हे, तर कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल, तो आपण पाळणार आहे. येथील विद्यमान आमदार भाजपचे आहेत, असे पत्रकारांनी विचारले असता, हो आपण कुठे नाकारतोय, त्यांच्यात आणि आपल्यात कोणताही वाद नाही. सांताक्रुझची उमेदवारी पक्ष ज्याला देईल, त्यांच्या मागे आपण ठाम खंबीरपणे उभा राहणार आहे, असे मोन्सेरात म्हणाले. आपण सरकारमधील तिसवाडी तालुक्याचा एकमेव मंत्री आहे. त्यामुळे तिसवाडीतील सर्व मतदारसंघांची जबाबदारी आपण घेतली आहे.
ताळगावमध्ये पूर्वी भाजप जिंकला नव्हता. मात्र, आपण आपल्या पत्नीसह भाजपात प्रवेश केल्यानंतर २०२२ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर आपली पत्नी जेनिफर तेथून जिंकली. ताळगावमध्ये भाजपचे कमळ फुलले. तसेच, सांताक्रुझमध्ये पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलवण्यासाठी आपण येथे कार्यालय पुन्हा सुरू केले आहे. असे सांगून आपण पक्षाला जे कार्य हवे ते करणार असल्याचे मोन्सेरात यांनी सांगितले.
दरम्यान, सांताक्रुझ मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार रुडाल्फ फर्नांडिस हे भाजपचे आमदार आहेत. मात्र, ते २०२२ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येऊन त्यानंतर इतर सात आमदारांसह भाजपात दाखल झाले होते. गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही सांताक्रुझ भाजपला जिंकता आलेला नाही. यावेळी बाबूश मोन्सेरात यांच्या सहकार्याने भाजप येथे जिंकण्याची तयारी करत आहे.
उमेदवारी कुणाला....
मोन्सेरात यांनी सांताक्रुझमध्ये कार्यालय सुरू केल्यामुळे भाजप रुडाल्फ फर्नांडिस यांना उमेदवारी देणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असून बाबूश मोन्सेरात हेच सांताक्रुझचे भाजपचे उमेदवार असू शकतात. तसे झाल्यास ताळगावमध्ये त्यांचे पुत्र रोहित मोन्सेरात यांना भाजपची उमेदवारी दिली जाईल आणि पणजीमध्ये उत्पल पर्रीकर किंवा सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना भाजपची उमेदवारी मिळू शकते, असे राजकीय विश्लेषक मानतात.