

पणजी : एक चित्रपट तयार करण्यामध्ये अनेक बाबी महत्त्वाची भूमिका निभावतात त्यामध्ये कथा दिग्दर्शन चित्रीकरण कलाकारांचा अभिनय यासोबत कलाकार ज्याप्रकारे पडद्यावर दिसतात यामध्ये त्यांची वेशभूषा देखील तितकीच महत्त्वाची भूमिका निभावते. कलाकारांचा पोशाख हाच सिनेमाचा ट्रेंडसेटर असतो. कोणताही चित्रपट वेशभूषेच्या नियोजनाशिवाय अपूर्णच असतो असे मत प्रसिद्ध वेशभूषाकार एका लखानी यांनी व्यक्त केले.
56 व्या इफ्फीमध्ये कॉस्च्युम अँड कॅरेक्टर आर्क : द ट्रेंडसेटर ऑफ सिनेमा या मुलाखत सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एका लखानी यांनी यांनी त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमधील वेशभूषेची उदाहरणे देत उदयोन्मुख फॅशन डिझायनर आणि कलाकारांना सिनेमामधील वेशभूषेचे महत्त्व आणि याच्या विविध पैलूंची माहिती दिली.
चित्रपटातील एखादे पात्र बोलण्यापूर्वी, त्यांचा पोशाख आधीच बरेच काही सांगून जातो, असे म्हणत जयप्रद यांनी मुलाखत सत्राला सुरुवात केली. यावेळी एका लखानी यांनी त्यांच्या चित्रपटांच्या वेळी आलेल्या अनुभवांचे आणि कामाचे कथन केले.त्यांनी मणिरत्नम यांच्या रावण चित्रपटाच्या सेटवर सब्यसाची मुखर्जीसोबत इंटर्नशिप करतानाच्या सुरुवातीच्या आठवण सांगितली. त्या म्हणाल्या की, मला वाटायचे की फॅशन म्हणजे सुंदर कपडे बनवणे. पण रावणने मला शिकवले की हे बाह्य सौंदर्य भावनांसह आले पाहिजे. तेव्हा कळले की पोशाख डिझाइन हा एक विभाग नसून एक चित्रपटाची एक भाषा आहे. त्यानंतर माझ्या कामाने प्रभावित होऊन सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी मला उरुमी हा चित्रपट दिला. जिथून माझा खरा प्रवास सुरू झाला.