

काव्या कोळस्कर
पणजी : आपल्या भारतीय संस्कृतीत आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींना अगदी जिवापाड जपले जाते. मग ती व्यक्ती असो वा वस्तू. या भावनांना संवादाची गरज नसतेच मुळी. केवळ ती गोष्ट आणि ते नाते शब्दांपलिकडचे असते. अशीच शब्दाविना विणली गेलेली कथा आहे हमसफर मधल्या आजोबा आणि त्यांच्या जुन्या रेडिओची. जिव्हाळा आणि भावनांचा मेळ असलेला लघुपट सर्वांनी जरूर पहहावा, असे आवाहन दिग्दर्शक अभिजीत दळवी यांनी केले.
56 व्या नव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नॉन फिचर फिल्म श्रेणीमध्ये दळवी यांची हमसफर ही कथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मुख्य पात्रामध्ये असलेले सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या मूक अभिनयाने प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला. कथानकात दर्शवल्याप्रमाणे जुन्या काळात रेडिओ आणि घरातील सदस्यांचे विशेष नाते आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हा संवाद कायम सुरू असायचा. मात्र काळ बदलला आणि काळाच्या ओघात रेडिओ लुप्त झाला. घरोघरी वॉकमन आले. पण हमसफर मधल्या आजोबांनी मात्र आपल्या रेडिओची साथ सोडली नाही.
पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या उतार वयात तो रेडिओच जणू त्याचा हमसफर बनला होता. मात्र एके दिवशी तो दिसेनासा होतो आणि आजोबांच्या जीवाची घालमेल होते. या कथेची प्रेरणा दिग्दर्शकाच्या बालपणातूनच जन्मलेली असल्याने आणि हा लघुपट संवादाविना असल्याने लघुपटाच्या बहुतांश तांत्रिक बाजू त्यांनाच सांभाळायला लागल्याचे ते सांगतात.