पणजी : ‘अ युजफुल घोष्ट’ या चित्रपटाने 2025 च्या 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप होणार आहे. यंदा पहिल्यांदाच चित्ररथाच्या माध्यमातून महोत्सवाचे ऐतिहासिक उद्घाटन झाल्यानंतर 81 देशांतील तब्बल 240 हून अधिक सिनेमे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळाली.
समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, तसेच सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाच्या समारोपात सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार, फीचर सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्त्व, सर्वोत्तम अभिनेता-अभिनेत्री अन्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
गोल्डन पिकॉकसाठी 15 चित्रपट...
यंदा गोल्डन पिकॉक या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी 15 चित्रपटांमध्ये चुरस आहे. यामध्ये आर्टिकल 370 (भारत), रावसाहेब (भारत), द गोट लाईफ (भारत), हू डू आय बिलॉन्ग टू (ट्युनिशिया-कॅनडा), वेव्ह्ज (झेक प्रजासत्ताक), टॉक्सिक (लिथुआनिया), द न्यू इयर दॅट नेव्हर केम (रोमानिया), शेफर्ड्स (कॅनडा-फ्रान्स), रेड पाथ (ट्युनिशिया), पियर्स (सिंगापूर), पॅनोप्टिकॉन (जॉर्जिया-अमेरिका), आय एम नेवेन्का (स्पेन), होली काऊ (फ्रान्स), गुलिझार (तुर्की), फिअर अॅण्ड ट्रेंम्बलिंग (इराण) यांचा समावेश आहे.
रजनीकांत, नंदमुरींचा होणार सन्मान
इफ्फीच्या समारोप सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत आणि नंदमुरी बालकृष्ण यांचा सन्मान करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल या दोन्ही दिग्गजांना सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्या प्रतिष्ठित कार्याची, लोकप्रियतेची आणि दशकांपासून चित्रपटसृष्टीला आकार देण्यातील योगदानाची दखल घेऊनच त्यांचा हा गौरव होणार आहे.