

पणजी : गोवा कृषी महाविद्यालयाच्यावतीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी "ग्रामीण कृषी कार्यानुभव" कार्यक्रम घेण्यात आला. गोव्यातील कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देणे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यंदा गोव्यातील रिवण, सुर्ला, लोटली, मायणा, सावईवेरे, मडकई आणि प्रियोळ या निवडक गावांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य आणि डीन डॉ. सुरेश कुंकळ्ळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झाला आहे. डॉ. श्रेयस जाधव हे या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. आमच्या पारंपरिक शेतीमध्ये अनेकदा कीड पडली की काय करावे सुचत नाही. पण या महाविद्यालयाच्या मुलांनी आमच्या शेतात येऊन मातीचे परीक्षण कसे करायचे आणि घरगुती पद्धतीने जैविक कीटकनाशके कशी बनवायची, हे खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले. या उपक्रमामुळे आम्हा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे, असे रिवण येथील शेतकरी रामनाथ नाईक यांनी सांगितले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घ्यायचे, याची माहिती या मुलांनी आम्हाला दिली, असे सुर्ल येथील शेतकरी सुवासिनी गावकर यांनी सांगितले.
पुस्तकात शिकलेली शेती आणि प्रत्यक्ष जमिनीत राबणारा शेतकरी यांच्यात खूप फरक आहे. मायणा गावातील शेतकऱ्यांसोबत काम करताना आम्हाला त्यांच्या रोजच्या समस्या समजल्या. आम्ही शिकलेले आधुनिक ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवताना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना एक वेगळेच समाधान मिळाले, असे विद्यार्थिनी प्रणाली परब (मायणा) हिने सांगितले.
सुर्ला गावातील हा कार्यानुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरत आहे. शेती हा केवळ व्यवसाय नसून ती एक जीवनपद्धती आहे, हे मला इथे प्रकर्षाने जाणवले. आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करत आहोत. हा अनुभव आम्हाला भविष्यात उत्तम कृषी अधिकारी किंवा शास्त्रज्ञ बनण्यास नक्कीच मदत करेल, असे सांगितले.