

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बनावट व भेसळयुक्त मद्य तस्करीप्रकरणी दोन महिन्यापूर्वी क्राईम ब्रँचने दाखल केलेल्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या शैलेश जयवंत जाधव (रा. ईश्वरपूर, सांगली महाराष्ट्र) याला सांगलीमधून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
यापूर्वी संशयित हुसेन साब मुल्ला याने - दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. भेसळयुक्त गोवा गुन्हे शाखेने बनावट तथा दारूच्या अवैध वाहतुकीप्रकरणी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये गुन्हा दाखल केला होता.
भारतीय न्याय कलम १२५, २७४, ३१८(४), ३३५, ३३६ (२), ३३६(३), ३४० (२) तसेच गोवा, दमण व दीव उत्पादन शुल्क कायदा कलम ३० (ए) व (बी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान एकूण १४९८ दारूचे बॉक्स, २५ किलो वजनाच्या एशियन पेंट्स मार्वेलोप्लास्टच्या ३५ पिशव्या तसेच संबंधित ट्रक असा सुमारे १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.३३ वाजता एमएच १० सीआर १८३९ क्रमांकाच्या ट्रकमधून गोव्यातून बेळगाव येथील अज्ञात ठिकाणी मानवी सेवनासाठी भेसळयुक्त दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. आवश्यक परवानगी व शासकीय शुल्क न भरता ही वाहतूक करण्यात येत असल्याने मानवी आरोग्य धोक्यात येण्याची तसेच संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता होती.