विधानसभा निवडणूक : ‘असा’ आहे गोव्याचा निवडणूक कार्यक्रम | पुढारी

विधानसभा निवडणूक : 'असा' आहे गोव्याचा निवडणूक कार्यक्रम

पणजी ; पुढारी वृत्‍तसेवा

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. १४ फेब्रुवारीला राज्यात निवडणूक होणार आहे. उमेदवारीसाठी २१ ते २७ जानेवारी या काळात अर्ज भरता येणार आहेत. राज्यात एकूण ११ लाख ५६ हजार ४६४ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये २२९५ नवमतदार असणार आहेत. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

पर्वरी व सांताक्रूझ मतदारसंघात प्रत्येकी एक, तर  वास्को मतदारसंघात दोन तृतीयपंथी
सर्वात जास्त मतदार वास्को मतदारसंघात 35 हजार 139
सर्वांत कमी मतदार मुरगाव मतदारसंघात 19 हजार 958
मतदारसंघवार मतदारांची सर्व साधारण संख्या 28 हजार 912चौकट 2295 जण नवमतदार

मतदारांपैकी उत्तर गोवा जिल्ह्यामध्ये पाच लाख 39 हजार 420, दक्षिण गोवा जिल्ह्यामध्ये सहा लाख 17 हजार 44 मतदार आहेत. मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे आणि गाळणे हा बदल 1.24 टक्के झालेला आहे. मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्याही एकूण मतदारांपैकी 1.67 टक्के आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याची संधी 2295 जणांना मिळणार आहे. ते 18 ते 20 वयोगटातील आहेत.

भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप हे पक्ष शक्यतो सर्व मतदारसंघातून उमेदवार उभे करणार आहेत. तर गोवा फॉरवर्ड, मगोप (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष) काही मोजक्या मतदारसंघातून उमेदवार उभे करतील. रोव्हॉल्युशनरी गोवन पक्षही मागे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाची फारशी हालचाल दिसत नाही.

निवडणुकीचे बिगुल वाजले…

काँग्रेस पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडूराव, निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम सध्या राज्यात ठाण मांडून आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी भेटी देऊन गेल्या आहेत. दिगंबर कामत, गिरीश चोडणकर यांच्या विविध मतदारसंघांमध्ये बैठका सुरू आहेत. आज (शनिवारी) काँग्रेसने सर्वाधिक अल्पसंख्याक लोकसंख्या असणार्‍या भागात सभा घेतली. नुकतेच काँग्रेसचे प्रवक्ते कन्हैया कुमार यांनी जाहीर सभा घेतल्या. शुक्रवारी 21 कलमी कार्यक्रम घेऊन राजभवनावर मोर्चा नेण्यात आला. मडगावमधून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, कुंकळ्ळीमधून युरी आलेमाव यांच्या उमेदवारी जाहीर झाल्या आहेत. कुडचडे, सांगे, फोंडा, बाणावली, काणकोण, नुवे या ख्रिश्चनबहुल मतदारसंघातही राजकीय नेते भेटीगाठी घेत आहेत.

सत्ताधारी भाजपने गुप्त बैठकांवर भर दिला आहे. संघटन मंत्री सतीश धोंड, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे हे विविध मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेटून आढावा घेत आहेत. सांगे मतदारसंघात भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. माजी आमदार सुभाष फळदेसाई व सावित्री कवळेकर हे दोघेही भाजपच्या उमेदवारीवर दावा करत आहेत. व्हिजन सांगेच्या नावाखाली सावित्री यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सुभाष फळदेसाई भाजपच्या बॅनरखाली प्रचार करत आहेत.

सावर्डे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवर दीपक पाऊसकर व माजी आमदार गणेश गांवकर यांच्यात उमेदवारीसाठी शर्यत सुरू आहे. कुडचडे येथे निलेश काब्राल व केपेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे. निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याही मोठ्या सभा झाल्या आहेत. सांगे, कुडचडे, केपे या भागात भाजपने जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. देश प्रभुदेसाई यांची मडगावमधील उमेदवारी निश्चित होती. त्यांनी नकार दिला. आता उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व उद्योजक तथा चित्रपट निर्माते राजेंद्र तालक यांच्या नावाची चर्चा आहे. शुक्रवारी रात्री उशिरा संघटनमंत्री सतीश धोंड आणि सदानंद शेट तानवडे यांनी गुप्त बैठक घेऊन कार्यकर्त्यांना प्रत्येक घरी जाऊन भेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तृणमूल काँग्रेसने आयपॅकच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार सुरू केला आहे. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, डेरिक ओब्रेओ हे चार महिन्यांपासून गोव्यात ठाण मांडूनच आहेत. दक्षिण गोव्याच्या सासष्टी तालुक्यात ज्या ठिकाणी आठही मतदारसंघांत ख्रिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय आहे. इथे त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. बाणावलीतून चर्चिल आलेमाव, नुवेतून राजू काब्राल, कुंकळीतून डॉ. जॉन्सन फर्नांडिस, मडगावमधून घनःश्याम शिरोडकर, नावेलीतून वालंका आलेमाव, सांगेतून राखी प्रभुदेसाई यांच्यासाठी आयपॅकने खास प्रचार सुरू केलाय. प्रत्येक मतदारसंघात कोपरा बैठक व घरोघरी भेटी देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

‘आप’ ने शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तसेच संभाव्य उमेदवारांची दुसरी यादीही लवकरच जाहीर केली जाणार आहे. या अनुषंगाने ‘आप’ च्या प्रत्येक मतदारसंघात बैठका आयोजित केल्या जात आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर ‘आप’ ने भर दिला आहे. कोपरा सभा व जाहीर सभाही घेतल्या जात आहेत. ‘आप’च्या नेत्यांनी नोकर भरतीतील घोटाळ्याबाबत थेट विश्वजित राणे यांनाच चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. रोजगार निर्मिती व महिलांना मासिक अनुदान अशा घोषणा करून ‘आप’ने मतदारांचे आपल्याकडे लक्ष वेधले आहे.

भंडारी समाजाचा मुख्यमंत्री आणि ख्रिश्चन समाजाचे उपमुख्यमंत्री करणार अशी घोषणाही केलेली आहे.  मगोपने दक्षिण गोव्यातील सावर्डे मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. बालाजी गावस हे सावर्डेचे उमेदवार आहेत. खुद्द सुदिन ढवळीकर मडकईतून प्रचार करत आहेत तर दीपक ढवळीकर प्रियोळमधून गोविंद गावडे यांच्या विरोधात लढणार आहेत.  गोवा फॉरवर्डने फातोर्डा आणि सांतआंद्रेकडे लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाचे सुप्रीमो विजय सरदेसाई स्वतः प्रचारात सहभाग घेताना दिसत आहेत. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी करण्याच्या तृणमूलच्या आवाहनाला विजय सरदेसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षामध्ये रिव्होल्युशनरी गोवनही मागे नाही. ते विविध मतदारसंघामध्ये बैठका घेत आहेत. मनोज परब या सर्व बैठकांना उपस्थिती लावत आहेत.

शिवसेनेच्या महाराष्ट्र पॅटर्ननुसार युतीसाठी चर्चा सुरू आहेत. त्यानुसार उमेदवार जाहीर केल्‍या जातील. सध्या काही उमेदवार वैयक्तिक पातळीवर प्रचार करत आहेत. राष्ट्रवादीचा कुठेच आवाज दिसत नाही. भाजप विरोधात महाआघाडीसाठी तृणमूल प्रयत्नशील आहे. काँग्रेस, मगो, तसेच आप या चारही समविचारी पक्षांनी महाघाडीला समर्थन दिल्यास राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.

Back to top button