नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने नागपुरात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी केल्याचे स्पष्ट झाले आहे. काश्मिरातून नागपूरला येऊन रेकी करणाऱ्या या दहशतवाद्याचा स्थानिक सहकारी (लोकल हँडलर) कोण याचा पोलिस शोध घेत आहेत. (RSS Nagpur)
जम्मू काश्मिरात काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला पोलिसांनी हँन्ड ग्रेनेडसह अटक केली. चौकशी दरम्यान या दहशतवाद्याने जुलै २०२१ मध्ये नागपुरातील रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याची माहिती सुरक्षा संस्थांना दिली. हा दहशतवादी जुलै २०२१ मध्ये विमानाने नागपूरला आला होता. नागपुरात आल्यानंतर तो सीताबर्डी परिसरातील एका लॉजमध्ये वास्तव्याला होता.
नागपुरात दोन दिवस त्याचा मुक्काम होता. ही माहिती पुढे आल्यानंतर याबाबत नागपूर पोलिसांना कळवण्यात आले. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी 'अनलॉफुल अॅक्टिव्हीटी प्रिव्हेन्शन अॅक्ट' (यूएपीए) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तसेच पोलिसांचे एक पथक या दहशतवाद्याच्या चौकशीसाठी श्रीनगरला रवाना झाले. दरम्यान जैश ए मोहम्मदचा स्लिपर सेल म्हणून काम करणारा तो तरुण नागपुरात असताना त्याला स्थानिक पातळीवर कोणी मदत केली होती का याचा शोध ही आता नागपूर पोलीस घेत आहेत.
नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून रेकी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अशा प्रकारची रेकी होणे ही गंभीर बाब असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात माध्यमांशी बोलताना सांगितले.
रेकी झाल्याची माहिती आता पोलिस व केंद्रीय यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे या संदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्र पोलिस आणि केंद्रीय यंत्रणा घेतील. पण याला अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.