Goa Butterfly : गोव्याला लवकरच मिळणार राज्य फुलपाखरू | पुढारी

Goa Butterfly : गोव्याला लवकरच मिळणार राज्य फुलपाखरू

पणजी : पिनाक कल्लोळी : Goa Butterfly :  गोव्याला लवकरच राज्य फुलपाखरू मिळणार असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या पक्षी महोत्सवात त्याच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक संतोष कुमार यांनी ही माहिती दिली. राज्याला स्वतःचे फुलपाखरू मिळणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संतोष कुमार यांनी सांगितले की राज्य फुलपाखरू निवडीसाठी वनखात्याकडून पर्यावरण तज्ज्ञांची एक समिती तयार करण्यात आली आहे. समितीने अभ्यास करून राज्यभरात आढळणाऱ्या पाच फुलपाखरांची नावे निश्चित केली आहेत.

Goa Butterfly : लोकांच्या मतदानातून राज्याचे फुलपाखरू ठरणार

पाचमधील राज्याचे फुलपाखरू कोणते व्हावे यासाठी सामान्य लोकांचे मतदान घेतले जाणार आहे. मतदान झाल्यावर डिसेंबरमध्ये होणाऱ्या राज्य पक्षी महोत्सवात याबाबत घोषणा करण्यात येणाची शक्यता आहे.

तज्ज्ञ समितीने निवडलेल्या फुलपाखरांमध्ये ब्ल्यू ओकलिफ कॉमन जिझबेल, मलबार ट्री निंफ, कमांडर आणि क्लिपर या फुलपाखरांचा समावेश आहे. यातील चार फुलपाखरे पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ असून कॉमन जिझबेल हे गोव्यासह संपूर्ण भारतात आढळते. तज्ज्ञसमितीमध्ये राज्याचे वनसंरक्षक सौरभ कुमार ,उपवनसंरक्षक जेबेस्टीन ए, वनाधिकारी परेश परब, गोवा जैवविविधता बोर्डचे डॉ प्रदीप सरमोकादम आणि पर्यावरण तज्ज्ञ पराग रांगणेकर यांचा समावेश आहे.

पराग रांगणेकर , पर्यावरण तज्ज्ञ

पर्यावरण पारिस्थितिकी संस्थेत फुलपाखरांची भूमिका महत्त्वाची असते. ते परागीकरणाची भूमिका निभावतात. त्यांच्याकडे केवळ एक सुंदर दिसणारा जीव म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन बद्दलणे आवश्यक आहे. फुलपाखरांचा पर्यावरीण, सांस्कृतिक वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासाठी राज्य फुलपाखरू असणे आवश्यक आहे.

सौरभ कुमार , राज्य वनसंरक्षक

सामान्य लोकांमध्ये फुलपाखरांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला आहे. केवळ शासकीय स्तरावर राज्य फुलपाखरु घोषित करण्यापेक्षा आम्ही सामान्य लोकांना, पर्यावरण प्रेमींना आणि विद्यार्थ्यांना मत देण्यास सांगितले आहे. राज्याचा प्राणी असताना फुलपाखरू असणेही महत्त्वाचे आहे.

Back to top button