Jalgoan Crime News : चोरटयाकडून तब्बल सहा लाख रुपयांच्या दागिन्यासह रोख रक्कम, पशुधन, चारचाकी वाहन लंपास | पुढारी

Jalgoan Crime News : चोरटयाकडून तब्बल सहा लाख रुपयांच्या दागिन्यासह रोख रक्कम, पशुधन, चारचाकी वाहन लंपास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यामध्ये चाळीसगाव, बोदवड, भडगाव, चोपडा या ठिकाणी चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम शेतकऱ्यांची जनावरे व चारचाकी वाहन असा तब्बल सहा लाख दहा हजार चारशे साठ रुपयांचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत चाळीसगाव येथील गणेश कॉलनी सावली बिल्डिंग येथे राहणारे रामदास चिंतामणी हे 21 जानेवारी ते 30 जानेवारी या काळात बाहेर गेलेले असताना बंद घराचे मुख्य दारवाजाचे कुलूप तोडून घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा दोन लाख 50 हजार 460 रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे पुढील तपास करीत आहे.

दुस-या घटनेत जामठी रोड तालुका बोदवड मार्गावरील स्मशान भूमीच्या बाजूला असलेल्या वाड्यातून 70 हजार रुपये किमतीच्या बैलांची जोडी आणि 25 हजार रुपयाची गिर गाय जनावरे पळवून नेली. बोदवड पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अशोक बारकू पाटील यांच्या चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील शिवारातील घरासमोर असलेल्या चाळीस हजार रुपयांची गावरान मावडी जातीची बैलांची जोडी पळवली. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे

तिस-या घटनेत ललिता वसंत गांगुर्डे (राहणार साखरी रोड प्लॉट नंबर 5 धुळे) यांची 35 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र भडगाव बस स्थानकावरून चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी भडगाव पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे शेती करणारे राकेश काशिनाथ अमृतकर यांच्या घरासमोरील दीड लाख रुपये किंमतीची एम एच 19 ए ई 4926 हे व्हॅगनार वाहन चोरट्यांनी बुधवार, दि. 31 च्या रात्री चोरून नेली. याबाबत भडगाव पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील अनुवर्द बुधगाव या ठिकाणी राहत असलेले शिवाजी केशव बोरसे यांच्याकडील रोख 80 हजार रुपये अंमळनेर बस स्थानकावरुन बसमध्ये चढत असताना चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी अंमळनेर पोलिसात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button