Goa News : निलंबित पोलिसाचा आणखी एक कारनामा व्हिडिओमुळे उघड | पुढारी

Goa News : निलंबित पोलिसाचा आणखी एक कारनामा व्हिडिओमुळे उघड

पणजी: पुढारी वृत्तसेवा : मारहाण प्रकरणात पूर्वी निलंबित झालेल्या ‘त्या’ वादग्रस्त पोलिस हवालदाराचा आणखी एक कारनामा व्हायरल व्हिडिओमुळे उघड झाला आहे. माशेल येथील एका फास्ट फूड विक्रेत्याला त्या हवालदाराने अन्य पाच जणांच्या मदतीने मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह अन्य तिघांचा समावेश होता. त्या सहा जणांविरुद्ध मारहाण झालेल्या दुकान मालक विराज माशेलकर यांनी म्हार्दोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Goa News

या प्रकरणातील मुख्य संशयित हवालदार समीर फडते याच्यावर जुने गोवा पोलिस स्थानकात ६ मार्च २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास फडते याने मेरशीतील एका भंगारअड्ड्याचा मालक वासू नाईक याला मारहाण केल्याप्रकरणी निलंबिनाची कारवाई झाली होती. सध्या फडते अन्य पोलिस स्थानकात सेवेत आहे. Goa News

दरम्यान, पुन्हा एकदा माशेलमधील एका फास्ट फूड स्टॉलच्या मालकाला धक्काबुक्की करत हल्ला केल्याचा त्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. या हल्ल्यात फास्ट फूड स्टॉलचा मालक विराज माशेलकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.त्यांना इस्पितळात उपचार करुन घरी पाठवण्यात आले आहे.

याप्रकरणी म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मारहाण प्रकरणी हवालदार समीर फडते, पोलिस शिपाई नितेश गाड व आकाश नावेलकर यांच्यासह मोहित गाड, अस्मित साळुंखे व सुप्रेश (पूर्ण नाव मिळालेले नाही ) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

Goa News हवालदाराची गुंडगिरी सीसीटीव्हीत कैद

क्षुल्लक कारणावरून त्या स्टॉल मालकावर सहा जणांनी हल्ला चढवला. त्या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. सध्या तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फास्ट फूड स्टॉलचे मालक विराज यांना सहा जणांनी पकडून मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यामध्ये हवालदार समीर फडते आणि विराज यांच्यात प्रथम शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर राग अनावर झालेल्या एकाने विराज यांच्या मानगुटीला पकडल्याचे दिसत आहे. त्यानंतर इतर सहाजण मिळून विराज यांच्या तोंडावर आणि छातीवर ठोसे लगावताना दिसत आहेत.

हेही वाचा 

Back to top button