गोवा: सलग सुट्ट्यांमुळे गोवा पर्यटकांनी गजबजला; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी | पुढारी

गोवा: सलग सुट्ट्यांमुळे गोवा पर्यटकांनी गजबजला; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी : प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी आणि त्यानंतर आज शनिवार, रविवार असे सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे गोव्यात देशी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. सलग सुट्ट्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यामध्ये दाखल झालेला आहे. गोव्यातील पर्यटन स्थळावर या पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

जुने गोवा येथील चर्च परिसरात तसेच मंगेशी व म्हार्दोळ येथील मंदिर परिसरामध्ये देशी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. संध्याकाळी मिरामार, दोनापावला, कळंगुट, हणजुन, वागातोर, मोरजी, बोगमाळे, पाळेले, मोबोर या समुद्र किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात देशी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. देशातील विविध राज्याचे नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांची प्रचंड संख्या गोव्यातील रस्त्यावर दिसून येत आहे. किनारी भागात तर संध्याकाळी समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक उपस्थित राहत आहेत. पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद घेताना दिसत आहेत.

जुने गोव्यात वाहतूक कोंडी

जुने गोवे येथील चर्च परिसरामध्ये पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली. हा रस्ता रुंद असला तरी दोन्ही बाजूला वाहने उभे केली जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी नो पार्किंगचे अनेक फलक लावलेले असतानाही वाहन चालक फलकाच्या बाजूलाच वाहने पार्किंग करत आहेत. पोलीसही येथे काहीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे इतर नागरिकांना या रस्त्याने ये-जा करणे अवघड झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button