

पणजी; प्रभाकर धुरी : गोवा येथे आयोजित ५४ व्या इफ्फीमध्ये मनोज बाजपेयी, राज निदिमोरू, कृष्णा डीके, अपूर्व बक्षी आणि श्रीकृष्ण दयाल या रुपेरी पडद्यावरील दिग्गजांसह, ओटीटीसाठी आकर्षक वेब मालिका तयार करण्यासंदर्भात एक मास्टर क्लास सत्र आयोजित करण्यात आले होते.
संबंधित बातम्या :
नमन रामचंद्रन यांनी या सत्रात सूत्रसंचालन केले, या सत्रात ओव्हर-द-टॉप (ओटीटी) मंचावर डिजिटल प्रेक्षकांसाठी प्रभावी कथा मांडण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेबाबत आणि बारकाव्यांसंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मनोज वाजपेयी यांनी एका अभिनेत्याचा अनाकलनीय प्रवास उलगडला. एखाद्या अभिनेत्याच्या आकांक्षा आणि पात्रात जीव ओतण्याच्या समर्पणाचा कॅनव्हास त्यांनी आपल्या शब्दांनी रंगवला. तयारी, सातत्य, पात्राचा आलेख आणि प्रत्येक अभिनेत्याचा कस याला आव्हान देणारा आणि उंचावणारा प्रवाह स्वीकारणे याला सर्वात महत्त्व आहे यावर त्यांनी भर दिला.
ओटीटी मंचाने स्वतंत्र सर्जनशील चित्रपटासाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली पाहिजे, असे मनोज वाजपेयी यांनी सांगितले. ओटीटीवर गाजलेल्या 'द फॅमिली मॅन'ची गाथा सांगताना मनोज वाजपेयी यांनी तयारीतील ताकदीचा कस आणि पात्राचा प्रवास पडद्यावर जगण्याची कला उलगडली.
'द फॅमिली मॅन' मालिकेतील एक प्रमुख अभिनेते श्रीकृष्ण दयाल यांनी रंगमंच आणि ओटीटीच्या डिजिटल कॅनव्हासमधील संबंध विशद केले. सातत्यपूर्ण दर्शकसंख्या हा ओटीटी मंचाचा सर्वात मोठा फायदा आहे, असे त्यांनी नमूद केले. रंगमंचावरील अनुभवातून आत्मसात केलेली शिस्त ही अभिनयाच्या विविध प्रकारांमध्ये अभिनेत्यांकडील क्षमतेचे संवर्धन करण्यास सक्षम करते, असे ते म्हणाले. ओटीटी मालिका 'द फॅमिली मॅन'चे सह-दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी ओटीटीच्या सातत्याने विकसित होत असलेल्या परिदृश्यावर माहितीपटाचा सखोल प्रभाव अधोरेखीत केला. आणि बदलत्या प्रतिमानाच्या भाव भावनांवर प्रकाश टाकला. या कथनांचा मंचावर होणारा महत्त्वपूर्ण परिणाम त्यांनी ठळकपणे मांडला.
सत्राच्या शेवटी, मनोज वाजपेयींच्या आगामी ओपस जोरामचा ट्रेलर देखील दाखवण्यात आला.
इफ्फीने यावर्षी सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी ) पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. यावर्षी, १५ ओटीटी मंचांवरून १० भाषांमध्ये ३२ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. विजेत्या मालिकेला प्रमाणपत्रे आणि १० लाख रोख बक्षीस रक्कम म्हणून दिली जाईल, याची घोषणा समारोप समारंभात करण्यात येणार आहे.
हेही वाचा :