'लॉंग बिल्ड डाऊविचर' : गोव्यात प्रथमच पक्षाची नोंद; दोन चिमुरड्यांनी केले छायांकित | पुढारी

'लॉंग बिल्ड डाऊविचर' : गोव्यात प्रथमच पक्षाची नोंद; दोन चिमुरड्यांनी केले छायांकित

पणजी ; पिनाक कल्लोळी

दोन चिमुरड्यांच्या प्रयत्नांमुळे गोव्यात एका नव्या जातीच्या पक्षाची नोंद झाली आहे. सिद्धार्थ आणि गौतम श्रीवास्तव या ११ वर्षीय जुळ्या भावांनी लोटली येथे ‘लॉंग बिल्ड डाऊविचर’ नामक अत्यंत दुर्मिळ जातीच्या पक्ष्याला छायांकित केले आहे. राज्यात पहिल्यांदाच या पक्षाची नोंद झाली असल्याने पक्षी निरीक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भारतात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लॉंग बिल्ड डाऊविचर

याआधी संपूर्ण भारतात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लॉंग बिल्ड पक्षाची नोंद झाली आहे. मुंबई, केरळ, राजस्थान आणि गुजरात राज्यात हा पक्षी आढळला होता. राज्यात प्रथमच या पक्षाची नोंद झाल्याने गोव्यात आढळणाऱ्या पक्षांची संख्या वाढून ४८२ झाली आहे.

पक्ष्याला कॅमेराबद्ध करणाऱ्या गौतमने सांगितले की, लोटली येथून जात असताना मला आणि सिध्दार्थला हा पक्षी दिसला. इतर पक्ष्यांपेक्षा याच्या हालचाली खूप वेगळ्या होत्या. हा पक्षी वेगळा असल्याचे जाणवले म्हणूनच आम्ही त्याची छायाचित्रे काढली.

याबाबत सिद्धार्थ आणि गौतम यांच्या आई प्रिया यांनी सांगितले की, मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात मी आणि माझ्या दोन मुलांनी पक्षीनिरीक्षण आणि छायाचित्रण सुरू केले. सुरवातीला जवळच्या भागातील पक्षी टिपले. नंतर राज्यभरात विविध ठिकाणी शिबिरे केली. यामुळे या छंदाची आवड वाढली.

पक्षाची छायाचित्रे काढल्यावर ओळख करण्यासाठी गोवा पक्षी संवर्धन संस्थेच्या मंदार भगत आणि ओंकार धारवाडकर यांच्याकडे पाठविण्यात आली. दोघांनीही त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण केले व देशातील इतर पक्षी निरीक्षकांशी चर्चा केल्यानंतर हा दुर्मिळ ‘लॉंग बिल्ड डाऊविचर’ असल्याचे समजले.

लॉंग बिल्ड डाऊविचर हा पक्षी मूळचा उत्तर गोलार्धातील

याबाबत मंदार भगत यांनी सांगितले की, लॉंग बिल्ड हा पक्षी मूळचा उत्तर गोलार्धातील आहे. हिवाळ्यात तो अन्य ठिकाणी स्थलांतर करतो. याआधी भारतात काही निवडक ठिकाणी हा पक्षी सापडला आहे. राज्यात दुर्मिळ पक्षी येत असल्याने येथील निसर्ग संपदा जपणे आवश्यक आहे.

Back to top button