कोव्हिड-19 ने मृत्यूचा धोका दुप्पट करणार्‍या जनुकाचा शोध | पुढारी

कोव्हिड-19 ने मृत्यूचा धोका दुप्पट करणार्‍या जनुकाचा शोध

लंडन : संशोधकांनी एका जनुकाचा असा प्रकार शोधला आहे जो कोव्हिड-19 चा धोका अधिक गंभीर करतो आणि या आजारामुळे साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना मृत्यू येण्याचा धोकाही दुपटीने वाढवतो. या जनुकाचे नाव आहे ‘एलझेडटीएफएल 1’. संक्रमण झाल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया देण्याच्या फुफ्फुसांच्या पेशींच्या प्रक्रियेला हे जनुकच नियंत्रित करीत असते.

या जनुकाचे धोकादायक व्हर्जन अस्तित्वात असेल तर ‘सार्स-कोव्ह-2’ या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्याबाबत फुफ्फुसांच्या पेशी कमी सक्रिय असल्याचे दिसतात. दक्षिण आशियाई वंशाच्या 60 टक्के लोकांच्या शरीरात या जनुकाचा धोकादायक प्रकार असून युरोपियन वंशाच्या 15 टक्के, आफ्रिकन वंशाच्या 2.4 टक्के आणि पूर्व आशियन वंशाच्या 1.8 टक्के लोकांमध्ये हे धोकादायक जनुक आढळते.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या जेम्स डेव्हीस यांनी ही माहिती दिली आहे. अर्थातच केवळ एक जनुक ‘कोव्हिड-19’ सारख्या आजारांचा धोका वाढवत नसून त्यामध्ये वय, अन्य प्रकारची आरोग्याची स्थिती, सामाजिक-आर्थिक स्थिती, वैद्यकीय सुविधा व अन्यही अनेक गोष्टी जबाबदार असतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

Back to top button