

मडगाव, पुढारी वृत्तसेवा: आखातात जाण्याचा आनंद साजरा करण्यासाठी मित्रांना दिलेली पार्टीत राडा झाला. दोन गटांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन पाच जणांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. पार्टी देणाऱ्या मित्राला पोलिसांनी विमानात बसण्याच्या तयारीत असताना मोपा विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. ही घटना आज (दि.८) पहाटेच्या दरम्यान बाणावली येथे एका हॉटेलबाहेर घडली. (Goa Crime News)
दोन्ही गट यावेळी दारूच्या नशेत होते. त्यात बरेच युवक जखमी झाले आहेत. रॉडने हल्ला झाल्यामुळे ऑलेसीयश बररेटो या युवकाच्या चेहरा आणि कानाला मार लागला आहे. त्याला उपचारासाठी इस्पितळात दखल करण्यात आले आहे. तर गॅरी रोद्रीगिस या युवकांच्या कानाला आठ टाके पडले आहेत. (Goa Crime News)
पार्टी देणारा संशयित सॅम्युअल मास्करेन्हस हा संधीचा फायदा उठवत युकेला जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याला विमानात बसण्याच्या तयारीत असताना मोपा विमानतळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सॅम्युअल मास्कारेन्हस हा रविवारी नोकरीच्या निमित्ताने युकेला जाणार होता. त्यासाठी त्याने आपल्या मित्रांना शनिवारी रात्री एक पार्टी देण्याचे नियोजन केले होते. बाणावलीतील एका हॉटेलवर ही पार्टी पार पडली. पण पार्टी आटोपून बाहेर येताच पहाटे सुमारे दोनच्या दरम्यान सॅम्युअल आणि त्याच्या मित्रांचा त्याच हॉटेलवर आलेल्या दुसऱ्या एका गटाशी वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.
बाणावली येथील रुजारीयो बररेटो यांनी दिलेल्या माहितीनुसार काही युवक दारूच्या नशेत दोघांना मारहाण करत होते. ओलेन्सीयो याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही त्या युवकांनी मारहाण केली. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत इस्पितळात नेले जात असताना त्या युवकांनी त्याला पुन्हा खारेबांद येथे अडवून त्याची गाडी फोडली आणि इस्पितळात नेणाऱ्या इतर युवकांनाही मारहाण केली.
कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक थेरन डिकॉस्ता यांनी सांगितले की, सॅम्युअल याला पकडण्यात आले आहे. अन्य तिघांना लवकरच ताब्यात घेतले जाईल. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा