गोवा : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची तयारी पूर्ण; पंतप्रधान मोदींच्या हस्‍ते उद्घाटन | पुढारी

गोवा : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची तयारी पूर्ण; पंतप्रधान मोदींच्या हस्‍ते उद्घाटन

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात पहिल्यांदाच होणार्‍या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 26 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष स्पर्धा दि.19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. राज्यातील 28 ठिकाणावर होणार्‍या या स्पर्धेत 43 क्रीडा प्रकारात 10806 खेळाडू त्याचबरोबर सुमारे 5 हजार तांत्रिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. 43 पैकी 36 क्रीडा प्रकारांमध्ये गोव्याचे खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (दि.६) दिली.

पर्वरी येथे मंत्रालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री गोविंद गावडे, गोवा सरकारच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन संघटनेच्या सचिव स्वेतीका सचेन, भारतीय ऑलंपिक संघटनेचे प्रतिनिधी अमिताभ शर्मा उपस्थित होते.

पहिल्यांदाच गोव्यामध्ये 43 क्रीडा प्रकार आणि 10 हजाराच्यावर क्रीडापटू सहभागी होत असल्यामुळे ही स्पर्धा विश्वविक्रम करणारी ठरणार आहे. यापूर्वी 2022 मध्ये गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये 36 क्रीडा प्रकारात 7263 खेळाडू सहभागी झाले होते. गोव्यात क्रीडा प्रकार आणि खेळाडू त्यापेक्षा बरेच जास्त आहेत. मल्लखांब, लगोरी, खोखो याारख्या स्थानिक खेळाचाही यावेळी समावेश करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गोव्यातील स्पर्धा दर्जेदार व्हावी यासाठी सरकार शक्यते सर्व प्रयत्न करत असून 28 ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत 43 क्रीडा प्रकारांमध्ये एकूण 730 इव्हेंट होणार आहेत. हे इव्हेंट आत्तापर्यंतच्या स्पर्धांतील सर्वात जास्त इव्हेंट आहेत. या स्पर्धेत 49 टक्के महिला खेळाडू आहेत.

स्थानिक मंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

विविध ठिकाणी होणार्‍या स्पर्धांचे स्थानिक मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. गोव्यात चांगले क्रीडापटू तयार व्हावेत यासाठी प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक क्रीडा संस्थांना सर्व अनुदान आणि सुविधा उपलब्ध करण्यात करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धी ही सकारात्मक ऊर्जा घेऊन आलेले स्पर्धा आहे. गोव्यात पहिल्यांदाच आयोजित होणारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोव्यातील खेळाडू, क्रीडा संस्था व नागरिकांचे सहाय्य आम्हाला लाभेल. 43 पैकी 36 क्रीडा प्रकारांमध्ये गोवेकर खेळाडू सहभागी होत असून त्यांच्याकडून पदकाची राज्याला अपेक्षा आहे. असे गोविंद गावडे म्हणाले. स्पर्धेसाठी सर्व त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. स्पर्धा दर्जेदार व्हावी यासाठी नियोजन चालू आहे. असेही गावडे म्हणाले. गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीवर भारतीय ऑलंपीक संघटना समाधानी असल्याचे अमिताभ शर्मा यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दि.26 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता फातोर्डा स्टेडियमवर स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी टी उषा आदींची उपस्थिती असेल. स्टेडियमची क्षमता 12 हजार असल्याने उदघाटन सोहळ्यासाठी प्रवेशिका ठेवल्या आहेत. विद्यार्थ्यांना हातात घालण्यासाठी खास बँड दिला जाईल. हा सोहळा विविध वाहिन्यावरुन थेट प्रक्षेपित होणार आहे. राज्यातील 10 जागी प्रक्षेपणाची खास सोय केली जाणार आहे.

पर्यटनासोबत क्रीडा राज्य

गोव्यात यापूर्वी लुसोफोनिया क्रीडा स्पर्धाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सध्या भारतीय फुटबॉल संघटनेची आयएफएल स्पर्धा सुरू आहे. यापूर्वी बीच हॉलीबॉल व वाटर स्पोर्टस आयोजन केले गेले आहे. आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहे. त्यामुळे गोवा पर्यटन राज्य आहेच, आता क्रीडा राज्य ही होईल असे मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button