गोवा : राज्यातील खाणी याचवर्षी सुरु होणार – मुख्यमंत्री प्रमोद सावंत | पुढारी

गोवा : राज्यातील खाणी याचवर्षी सुरु होणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी, पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील २०१२ पासून बंद असलेला खाण व्यवसाय या वर्षी निश्चितपणे सुरू होणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी सर्व तयारी सुरू केली. खाणी सुरू पुन्हा सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. एकदा खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर तो किमान ७ ते ८ वर्षे सलगपणे चालू राहणार आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. एका कार्यक्रमानंतर बोलताना मुख्यमंत्र्यानी याबाबत भाष्य केले आहे.

काही खाण कंपन्यानी लिलावामध्ये घेतलेल्या खाणीसाठीचे विविध परवाने मिळवले आहेत. बहुतांश कंपन्यांनी सर्व प्रक्रिया जवळजवळ पूर्ण केल्या असून त्यांनाही खाणी लवकर सुरू करायच्या आहेत. पाऊस थांबण्याची प्रतीक्षा सर्वांना आहे. त्यामुळे पाऊस थांबताच राज्यातील खाणी नक्कीच सुरू होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.

खाणी सुरू झाल्यानंतर खाण कंपन्या व आस्थापने त्याचबरोबर खाण क्षेत्रातील नागरिक आणि खाणींवर अवलंबून असलेले नागरिक या सर्वानाच दिलासा मिळणार असून सरकार राज्यातील खाण व्यावसाय शाश्वत खाण व्यवसाय व्हावा यासाठी सर्व ते प्रयत्न करत असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. राज्यातील खाण व्यावसाय एकदा सुरू झाल्यानंतर तो पुढील सात ते आठ वर्षे निश्चितपणे पूर्ण क्षमतेने चालणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 राज्याची आर्थिक स्थिती मजबूत

खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर लगेच कोरोना महामारी आली आणि राज्याची आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती. मात्र, आता राज्यातील पर्यटन व्यवसाय जोमात सुरू झाला आहे. खाणी सुरू होणार आहेत. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले. विविध माध्यमातून राज्याला महसूल मिळत आहे. त्या महसुलाचे योग्य व्यवस्थापन करून राज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत झालेले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका प्रश्नावर बोलताना दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button