Ashadhi Ekadashi 2023 | गोव्यातील प्रतिपंढरपूर साखळीतील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मंत्री विश्‍वजित राणेंच्या हस्ते पूजा | पुढारी

Ashadhi Ekadashi 2023 | गोव्यातील प्रतिपंढरपूर साखळीतील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मंत्री विश्‍वजित राणेंच्या हस्ते पूजा

पणजी : पुढारी वृत्तसेवा; आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. लाखो हरीभक्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जमलेले असतानाच गोव्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या साखळी येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्येही भाविकांची गर्दी झाली. गोव्याचे नगर विकास व आरोग्य खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे यांनी आज पारंपारिक पद्धतीने विठ्ठल- रुक्मिणीचे पूजन केले. (Ashadhi Ekadashi 2023)

आज (दि. २९) पहाटे विश्‍वजित राणे यांनी भिरोंडाचे सरपंच व देवस्थानाचे महाजन उदयसिंह राणे यांच्यासोबत विठ्ठल- रुक्मिणी आणि राही या देवतांना अभिषेक घालून विधिवत पूजा केली.

गेली अनेक वर्षे गोव्याचे सहावेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले विश्‍वजित राणे यांचे वडील प्रतापसिंह राणे हे विठ्ठल- रुक्मिणीची पूजा करत होते. यावेळी राणे कुटुंबीयांची मालकी असलेल्या या मंदिरात आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ही पूजा पारंपरिक पद्धतीने केली.

दरम्यान, गोव्यातील सुमारे सहा ते सात हजार भाविक विविध वारकरी मंडळाच्या माध्यमातून पायी चालत पंढरपूरला गेले आहेत. ज्यांना पंढरपूरला पायी चालत जाणे शक्य होत नाही ते भाविक दरवर्षी साखळीला पायी चालत येतात. विविध गावातून दिंडीसह येताना विठू नामाचा गजर करीत, जय जय राम कृष्ण हरी! विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, संतांचा खेळ गोपाळांचा डाव मांडला! असा गजर करत या वारकऱ्यांच्या दिंड्या पायी चालत चालत गोव्यातील प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या साखळीतील विठ्ठल मंदिरामध्ये आज दाखल झाल्या.

सत्तरीत, डिचोली, फोंडा तालुक्यातील दिंडी पथकांचा यामध्ये समावेश आहे. ज्यांना पंढरपूरला जाणे पायी चालत जाणे शक्य होत नाही, असे अनेक भाविक आपल्या गावातून साखळीला पायी चालत येतात आणि विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात.

दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्येही आषाढी एकादशीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासून देवतांच्या मूर्तीना अभिषेक त्यानंतर पारंपारिक पद्धतीने पूजा भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

साखळी- विठ्ठल मंदिराच्या बाहेर जमलेले वारकरी.

गेल्या काही वर्षांमध्ये गोव्यामध्ये पारंपारिक दिंडी स्पर्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. सुमारे ६० ते १०० लोक यातील एका दिंडीपथकात सहभागी असतात. विविध पद्धतीने दिंड्या सादर होतात. या स्पर्धामुळे गायन, पखवाज व टाळ याच्यासह नृत्याचीही जुगलबंदी पहायला मिळते. (Ashadhi Ekadashi 2023)


हे ही वाचा :

Back to top button