जयपूरमध्ये मला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली : महेंद्रसिंग धोनी भावुक | पुढारी

जयपूरमध्ये मला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली : महेंद्रसिंग धोनी भावुक

जयपूर, वृत्तसंस्था : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये सीएसके संघाचा 32 धावांनी पराभव झाला. हा सामना सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या पराभवानंतर सीएसकेचा कप्तान महेंद्रसिंग धोनी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या आठवणींना उजाळा दिला. या मैदानावर केलेल्या 183 धावांच्या खेळीमुळे मला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली, असे धोनीने सांगितले.

गुरुवारी राजस्थानने ठेवलेल्या 203 धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (47) आणि शिवम दुबे (33 चेंडूंत 52 धावा) यांनी झुंजार फलंदाजी केली. मात्र सीएसकेला 20 षटकांत 170 धावांपर्यंतच मजल मारता आली. सामन्यानंतर धोनीने माध्यमांशी संवाद साधला.

जयपूरमधील आठवणींना उजाळा देत कर्णधार धोनी म्हणाला, मला वाटते की माझे पहिले एकदिवसीय शतक करण्यासाठी मला 10 सामने लागले, पण याच खेळपट्टीवर मी श्रीलंकेविरुद्ध 183 धावा केल्या. याच मैदानावरून माझ्या करिअरला नवे वळण लागले. त्यामुळे हे मैदान माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे, असे सांगत तो भावुक झाला.

यासोबतच, यशस्वीच्या फलंदाजीचे कौतुक केले. यशस्वीने खरोखरच चांगली फलंदाजी केली, गोलंदाजांचा पाठलाग करणे, जोखीम पत्करणे महत्त्वाचे होते. आमच्या गोलंदाजांविरुद्ध हे थोडे सोपे होते. कारण आम्हाला योग्य लेंथचा निर्णय घ्यायचा होता. तरीही यशस्वीने चांगली फलंदाजी केली, असे धोनी म्हणाला.

राजस्थान रॉयल्सने पॉईंट टेबलचे टॉपर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 202 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर यशस्वी जैसवालने 43 चेंडूंत 77 धावांची धडाकेबाज खेळी केली. विशेष म्हणजे सवाई मानसिंह स्टेडियमवर कोणालाही 200 धावांचा टप्पा पार करता आला नव्हता तो राजस्थानने संजू सॅमसनच्या 200 व्या सामन्यात पार केला. राजस्थानने 32 धावांनी सामना जिंकत 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

Back to top button