गोव्यातील महिलेने अमेरिकन नवर्‍यासाठी मोजले २ कोटी ६९ लाख: पदरी निराशाच; शेवटी पोलीस ठाण्यात धाव | पुढारी

गोव्यातील महिलेने अमेरिकन नवर्‍यासाठी मोजले २ कोटी ६९ लाख: पदरी निराशाच; शेवटी पोलीस ठाण्यात धाव

पणजी; पुढारी वृत्तसेवा : मूळ महाराष्ट्रातील पण सध्या करंजाळे पणजी (गोवा) येथे राहणार्‍या एका महिलेने अमेरिकन नवरा मिळावा, यासाठी तब्बल २ कोटी ६९ लाख रुपये खर्च केले. मात्र, तिच्या हाती काहीच लागले नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने महिला पोलिस ठाण्यात धाव घेतली.

अमेरिकन नागरिकाशी लग्न करण्यासाठी लागणारा यूएसए फियान्से व्हिस्सा देण्याचे आमिष एका व्यक्तीने या महिलेला दाखविले. महिला या आमिषाला भुलली व सदर व्यक्तीने सांगितलेल्या बँकेच्या खात्यात पैसे जमा करत राहिली. ही रक्कम तब्बल २ कोटी ६९ लाख रुपये झाली तरी अमेरिकन नवर्‍याचे तोंड काही पाहता आले नाही. त्यामुळे तिला त्या मध्यस्त व्यक्तीचा संशय आल्याने तिने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्कच बंद झाला. शेवटी आपणास २ कोटी ६९ लाखांचा गंडा घातला गेल्याचे तिच्या लक्षात आले आणि ही महिला गोवा पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार देण्यास पोहोचली. पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली असून तक्रारीत चार विदेशी व्यक्तीची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

… आणि तरीही लोक फसतात

सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो, कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसाचे आमिष दाखवून, रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून अथवा मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून अनेक भामटे लोकाना फसवतात. अशा भामट्यांच्या आमिषांना लोक बळी पडतात. या भामट्यांचा शोधही क्वचितच लागतो. त्यामुळे पोलिस सोशल मीडियावरून केल्या जाणाऱ्या आमिषांना भुलू नका, पैसे गुंतवू नका असे आवाहन करतात. प्रसिद्धी माध्यमात वारंवार असा बातम्या येतात. तरी लोक लाखो रुपये गुंतवून फसतातच. यात आता शिकलेल्या तसेच श्रीमंत व्यक्तीचांच जास्त भरणा असतो.

हेही वाचा : 

Back to top button