सोनाली फोगाट खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

सोनाली फोगाट खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची माहिती
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा : टिक टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या खुनाचे प्रकरण सीबीआयकडे देण्यास गोवा सरकार तयार आहे. यासंदर्भात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी चर्चा झाल्याचेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी शनिवारी रात्री रूमबॉयला ड्रग्ज पुरविणारा आणखी एक पेडलर रमाकांत मांद्रेकर (रा. हणजुण) याला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या पाच झाली आहे.

पोलिसांनी सोनालीच्या मृत्यूप्रकरणी त्यांचा स्वीय सहायक सुधीर सांगवान, मित्र सुखविंदर सिंग, कर्लिस बारचा मालक एडविन नुनीस व दत्तप्रसाद गावकर यांना यापूर्वीच अटक केली आहे. रविवारी सकाळी रमाकांत मांद्रेकर या ड्रग्ज पेडलरला अटक केली.
या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, सोनाली फोगाट खूनप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. मुख्यमंत्री खट्टर यांनी शनिवारी रात्री आपल्याला फोन केला होता. यावेळी त्यांनी सोनालीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सीबीआय तपासाची मागणी केल्याचे सांगितले. कुटुंबीयांच्या मागणीनुसार हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, असे खट्टर यांनी सांगितल्याचे डॉ. सावंत म्हणाले. गोवा पोलिस महासंचालक आणि अन्य अधिकार्‍यांसोबत चर्चा करून याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमली पदार्थविरोधी पथक होणार अधिक सक्षम

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, गोवा पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक अधिक सक्षम करणार असून हे पथक अधिक कडक कारवाई करणार आहे. दर महिन्याच्या कामगिरीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना या पथकाला दिल्या आहेत. या विभागावर आपण लक्ष ठेवणार आहे.

बारमालकासह पेडलरना पाच दिवसांची कोठडी

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कर्लीस बारचा मालक एडविन नुनीस, रूमबॉय दत्तप्रसाद गावकर आणि रूमबॉयला ड्रग्ज पुरविणारा रमाकांत मांद्रेकर यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news